कामगारांचा आक्रमक नेता, माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन
नवी दिल्ली:- देशाच्या कामगार चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पेलणारे देशाचे माजी संरक्षण मंत्री मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज वृद्धापकाळाने वयाच्या ८८ व्या वर्षी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी सात वाजताना निधन झाले. त्यांच्या जाण्याने देशातील कामगारांसाठी आयुष्य पणाला लावणारा झुंजार नेता हरपल्याची भावना संपूर्ण देशातून व्यक्त होत आहे.
जॉर्ज फर्नांडिस यांनी देशाचे राजकारण आणि समाजकारण व्यापून टाकत आपला ठसा उमटविला होता. १९७४ च्या रेल्वे संपापासून जॉर्ज फर्नांडिस यांचे नेतृत्व कामगार चळवळी मध्ये आक्रमक भूमिका घेणारे ठरले. आणीबाणीच्या काळात त्यांनी वेष बदलून सरकारला गुंगारा दिला. त्या कालावधीत त्यांनी केलेले कार्य हे सुद्धा भारतीय इतिहासात स्मरणात राहणार आहे. कारण जॉर्ज फर्नांडिस आणीबाणीनंतर तुरुंगात असतानासुद्धा बिहारमधून लोकसभेच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झाले. जनता पार्टीच्या काळात ते उद्योगमंत्री व नंतरच्या काळामध्ये रेल्वेमंत्री झाले. तर केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या आघाडी सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले. संरक्षण मंत्री असताना त्यांनी भारतीय सैन्यासाठी अत्यंत चांगले निर्णय घेत आपल्या दूरदृष्टीची चुणूक दाखवली.
समाजवादी विचारांचा हा नेता सतत कामगारांची बाजू आक्रमकपणे मांडत राहिला. रेल्वेमंत्री असताना कोकण रेल्वेसाठी दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. तत्कालीन अर्थमंत्री प्रा. मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी कोकण रेल्वे पूर्णत्वास जावी म्हणून स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करून खूप मोठे योगदान दिले आहे.