सर्व घटकांना सामावून घेणारा निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प संसदेत सादर!
नवी दिल्ली:- आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी संसदेमध्ये केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला.
सदरचा अर्थसंकल्प हा लोकसभा निवडणुकीपूर्वी असल्याने सर्वमान्य आणि लोकप्रिय होण्यासाठी शासनाने सवलतींचा वर्षाव केला. शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक, महिला ह्या सर्वांना खुश करताना अनेक आकर्षक सवलती देण्याची घोषणा प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली.
‘१२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना, तीन कोटींहून अधिक मध्यमवर्गीय करदात्यांना आणि ३०-४० कोटी श्रमिकांना या अर्थसंकल्पीय तरतुदींमुळे थेट लाभ मिळणार आहे,’ असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.
अंतरिम अर्थसंकल्पातील महत्त्वाचे अकरा मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत!
१) पाच लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले असून त्याचा देशभरातील तीन कोटी मध्यमवर्गीय करदात्यांना थेट लाभ होणार आहे. ५ लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास पूर्वीप्रमाणेच टॅक्स लागणार
२) दोन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाकाठी सहा हजार रुपये जमा होतील. सुमारे १२ कोटी शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होणार असून शासनाला दरवर्षी ७५ हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत! डिसेंबर २०१८ पासून दरमहा पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. सदर योजनेला पंतप्रधान किसान सन्माननिधी असे म्हटले जाणार आहे. त्याचप्रमाणे साठ वर्षे पूर्ण झालेल्या मजुरांना तीन हजार रुपयांची पेन्शन देण्यात येणार आहे.
३) प्रधान मंत्री मातृत्व योजनेला सुरुवात झाली असून त्याअंतर्गत गरोदर महिलांना २६ आठवड्यांची भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे.
४) उज्वला योजनेअंतर्गत स्वयंपाकाचा गॅस सहा कोटी घरांमध्ये पोहोचला असून आठ कोटी कुटुंबात स्वयंपाकाचा गॅस पोहचविण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
५) बँकेत किंवा पोस्टात ठेवलेल्या रकमेवरील चाळीस हजार पर्यंतच्या व्याजावर टॅक्स आकारण्यात येणार नाही.
६) २ लाख ४० हजार पर्यंतच्या घर भाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लागणार नाही.
७) ज्यांना २१ हजार रुपये पगार आहे, त्या कामगारांना सात हजार रुपये बोनस येणार असून ग्रॅच्युईटीची मर्यादा दहा लाखांवरून वीस लाख करण्यात आली.याचा १० कोटी असंघटीत कामगारांना फायदा होणार आहे.
८) केंद्र सरकारने गोरक्षण व संवर्धनासाठी कामधेनु योजनेची अर्थसंकल्पात घोषणा केली असून त्यासाठी ७५० कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत गोसंवर्धनसाठी राष्ट्रीय गोकुळ आयोगाची स्थापना सरकार करणार आहे.
९) रेल्वेसाठी ६४ हजार ५०० कोटींची तरतूद आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. .
१०) संरक्षण खात्यासाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
११) आयुष्यमान भारत योजनेतून ५० कोटी लोकांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.