युनायटेड किंगडमचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट
मुंबई:- युनायटेड किंगडमचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध विकास कामे व सुविधांबाबत चर्चा केली.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या भेटीच्या वेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कृषी, उद्योग, राज्यातील विविध पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीबाबत चर्चा झाली. महाराष्ट्रात मेट्रोचे काम अत्यंत जलद गतीने सुरु असून २०२२ पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे पुढील दोन-तीन वर्षानंतर मुंबईसह महाराष्ट्रात चांगला बदल झालेला दिसून येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘स्वच्छ भारत अभियान’ राज्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. तसेच फलोत्पादन, जलसंधारण, कृषी आदी क्षेत्रात उत्तम कार्य सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. १० ते १५ वर्षापूर्वी जीडीपीबाबत लोकांमध्ये चर्चा नव्हती. परंतु आता या संदर्भात ते चर्चा करीत असतात. हा मोठा बदल असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
श्री. ब्लेअर यांनी महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या प्रकल्पांची सविस्तर माहिती घेऊन टोनी ब्लेअर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपले स्वागत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.