समाजातील अदृष्य विषमतेची दरी संपविण्यासाठी युवा वर्गाचा पुढाकार महत्त्वाचा!
गोपुरी आश्रमाच्या वाचन संस्कृती विकास उपक्रमाच्या युवकांनी व्यक्त केले मत
कणकवली:- समाजातील अदृष्य विषमतेची दरी संपविण्यासाठी युवा वर्गाचा पुढाकार महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा पुरस्कार करताना आपल्या महाराष्ट्रातील काही भागातील (विशेषत: आदिवासी) नागरिकांना जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठीच्या नागरी सुविधा मिळत नाहीत; ही बाब चिंताजनक आहे! असे परखड मत वाचन संस्कृती विकास उपक्रमात सिद्धी वरवडेकर यांनी व्यक्त केले. संशोधक हेरंब कुलकर्णी यांच्या `दारिद्र्याची शोधयात्रा’ या पुस्तकावर आणि अतुल देऊळगावकर यांच्या `दारिद्र्याची शोधयात्रा आणि महाराष्ट्राची अस्मिता’ या साधना साप्ताहिकाच्या २३ मार्च २०१९ मधील लेखावर मत व्यक्त करताना सिद्धी वरवडेकर बोलत होत्या.
हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील आदिवासी विभागातील प्रत्यक्ष संशोधनावर आधारित नागरी सुविधांच्या दुरावस्थेविषयी संशोधनात्मक ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात विशेषतः आदिवासी विभागातील नागरी सुविधांच्या अनुपलब्धतेची भयानकता मांडली आहे.
पल्लवी कोकणी हिने ‘माय स्ट्रोक ऑफ ईनसाईट’ या जिल बोल्ट टेलर यांच्या चरित्रावर बोलताना जिल बोल्ट ही मेंदू आजाराने पूर्णतः शारीरिकदृष्ट्या कोलमडूनही आयुष्यात कशी उभी राहते? याविषयीची प्रेरणादायी वास्तव मांडलं.
सूरज ठेंगील यांनी विष्णु औटी ह्या आयएएस अधिकारी पदाची परीक्षा यशस्वी झालेल्या एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाच्या युवा वर्गाला प्रेरणादायी असलेल्या `नाना मी साहेब झालो!’ या आत्मचरित्राचे विवेचन केले.
तेजश्री आचरेकर हिने डॉ. मधुकर मंडलेकर यांच्या `मात अंथारावर’ या एका अंध तरीही प्रतिथयश डॉक्टरच्या चरित्राचे विवेचन केले. अंधत्व येवूनही डॉक्टरांनी हार न मानता वैद्यकीय पदवी संपादन केलीच; पण प्रॅक्टिस सुद्धा यशस्वीपणे करण्यात यश संपादन केले. तो प्रेरणादायी प्रवास तेजश्री आचरेकर हिने मांडला.
प्रसाद सावंत याने पु.ल. देशपांडे यांच्या `बटाट्याची चाळ’ या पुस्तकाचे विवेचन केले.
सोनल भिसे हिने प्र.के.अत्रे यांच्या `चांगुणा’ या कादंबरीचे विवेचन केले.
हमीद दलवाई यांच्या `जमिला जावद आणि इतर कथा’ या कथासंग्रहातील दहा रुपयाची नोट,जमिला जावद व ब्राह्मणांचा देव या तीन मनाला भिडणाऱ्या कथाविषयी विवेचन करताना अर्पिता मुंबरकर म्हणाल्या; चिपळूणसारख्या ग्रामीण भागात दारिद्र्य होते; परंतु या परिसरातील नागरिकांमध्ये एकमेकांविषयीची आपुलकी, धार्मिक सहिष्णुता हमीद दलवाई यांनी या कथांच्या माध्यमातून वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हमीद दलवाई यांचे साहित्य युवाईने वाचावे असे आवाहन अर्पिता मुंबरकर यांनी केले.
ऐमन शेख हिने नसिमा हुरजुक यांच्या `चाकाची खुर्ची’ या आत्मचरित्राचे विवेचन करताना नसिमा दिदी यांनी पराकोटीच्या अपंगत्वावर मात करून अपंग बांधवांना जीवन जगण्यासाठी कशी प्रेरणा दिली? यांचे विवेचन केले.
सतेज शेट्टी यांने `इच्छा शक्ती प्रबळ’ असल्यास आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो; हे एका बॉक्सरच्या जीवनाच्या विषयीच्या कथेतून विवेचन केले.
ऐमन शेख हिच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शक प्रा. डॉ. अनिल फराकटे यांनी उपयुक्त सूचना केल्या.
यावेळी डॉ.शमिता बिरमोळे यांनी विचारांना कृतिची जोड द्यायला हवी. त्यादृष्टीने युवा वर्गाची वाटचाल असायला हवी असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र मुंबरकर, पत्रकार विजय शेट्टी, कवयित्री सरिता पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्वेता ढवळ, सूत्रसंचालन शैलेश कदम तर आभार किरण साटम हिने मानले.