शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी! – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

कोणाचाही पंचनामा बाकी राहणार नाही याची दक्षता घ्या! – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)- जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादाळमुळे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या नुकसानीचे पंचनामे करत असताना कोणाचाही पंचनामा बाकी राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी; अशा सूचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या. जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज श्री. पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

या पाहणीवेळी आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने, वैभवाडीचे तहसिलदार रामदास झळके, मालवणचे तहसिलदार अजय पाटणे, मालवणचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हेत्रे, सावंतवाडी उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसूळ, अमित सामंत, काका उर्फ हेमंत कुडाळकर आदी उपस्थित होते.

वादळाचा तडाखा किनारपट्टीला सर्वात जास्त बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. झाडे पडणे, घरांच्या नुकसानीसोबतच मच्छीमारांच्या नौका वाहून जाणे, फुटणे, जाळी वाहून जाणे अशा प्रकारचे नुकसान झाले आहे. सर्वात जास्त नुकसान महावितरणचे झाले आहे. त्यामुळे अनेक भागांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. लोकांना विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हा खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्यासाठी जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आले आहे. अनेक टीम यासाठी कार्यरत आहेत. महावितरणने वीज पुरवठा सुरू करण्यासाठी कृती आराखडा केला आहे. त्याप्रमाणे योग्य प्रकारे काम करावे. वीज पुरवठा सुरू करण्यासाठी जिल्ह्यात पोल, वायरही आल्या आहेत. पण त्यासाठी लागणारे जोडणीचे महत्वाचे सामान जिल्ह्यात उपलब्ध होत नाही. सदरचे सामान कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून आणावे लागणार आहे. त्यासाठी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी यांना तशा प्रकारच्या सूचना देऊन हे सामान तयार करणाऱ्या कंपन्या व विक्रेते यांना परवानगी देण्याविषयी कळवले असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

मासेमारी संस्थांचे प्रश्न सोडवावेत अशा सूचना देऊन श्री. पाटील म्हणाले की, कोकणात झांडावर अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. वादळामुळे ही झाडे पडल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून वादळातील नुकसानग्रस्तांना मदत देण्याविषयी निर्णय घेण्यात येईल. तसेच शेतकरी घरावर आलेली झाडाची फांदी तोडतात, त्यामुळे झाडाचा तोल बिघडतो व झाड कोसळते याविषयी लोकांमध्ये जागृती करण्यासाठीही काम करण्याची गरज असल्याचेही श्री. पाटील म्हणाले.

यावेळी सहकार मंत्री श्री. पाटील यांनी वैभववाडी तालुक्यातील करुळ, जामदारवाडी, वैभववाडी, खोटले, नाधवडे या गावांची पाहणी केली. मालवण तालुक्यामध्ये चिवला, वायरी, दांडी भागात पाहणी करून नुकसानग्रस्तांची कैफियत ऐकून घेतली. तसेच वेंगुर्ला तालुक्यात नवाबाग, उभादांडा आणि सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथेही झालेल्या नुकसानीची पाहणी श्री. पाटील यांनी केली.

या पाहणीवेळी श्री. पाटील यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. तसेच महावितरणच्या मदतीसाठी आलेल्या जिल्ह्या बाहेरील कामगारांची अस्थेवाईकपणे विचारपूस केली.

You cannot copy content of this page