सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेचे वास्तव भयावह!  रुग्णवाहिका सेवेचे दरपत्रक जाहीर करा!

सिंधुदुर्गात आरोग्य यंत्रणा नेहमीच व्हेंटीलेटरवर नव्हे तर लाईफ सपोर्ट सिस्टीमवर होती आणि आता कोरोनाच्या उद्रेकानंतर ती मृत झाली असे खेदाने म्हणावे लागते. विकासाचा कोणताही मुद्दा असो वा जनतेची मूलभूत गरज असो, राजकीय नेत्यांनी नेहमीच आरोप प्रत्यारोपांचे नाटक करायचे आणि जनतेने तो दशावतार पाहून त्यात सुख मानायचे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत पाक्षिक `स्टार वृत्त’च्या माध्यमातून आम्ही कित्येक वर्षे लिखाण करतोय; पण राजकीय इच्छाशक्तीच दुर्बल असल्याने प्रशासकीय कारभार नेहमीच भोंगळ व्यवस्था निर्माण करणारा ठरतो. 

गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून आजपर्यंत जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी पुरेसा अवधी होता; पण कुठल्याही गंभीर समस्येतून काहीही बोध न घेता पुन्हा पुन्हा तसाच कारभार सुरु ठेवायचा; हेच धोरण जनतेसमोर येत आहे. कालच एका महिलेशी रुग्णवाहिका चालक (तथाकथित ठेकेदार) अगदी राक्षसी वृत्तीने बोलला आणि त्याचे संभाषण सोशल मीडियावरून सर्वांकडे पोहचले. त्याचप्रमाणे गेल्या आठ दहा महिन्यात सोशल मीडियावरून अनेक भयावह गोष्टी समोर आल्या. त्यातून आरोग्य यंत्रणेचे भयाण वास्तव समोर आले. 

आज जिल्हयात पुरेशा रुग्णवाहिका नाहीत; त्यामुळे रुग्णांच्या आणि मृत रुग्णांच्या नातेवाईकांची भरमसाठ लूटमार सुरु आहे. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका वाढविणे अत्यावश्यक असताना कोणतीच हालचाल प्रशासनाने केली नाही. १०८ क्रमांकाच्या ज्या रुग्णवाहिका आहेत त्या रुग्णवाहिका चालविणारे चालक अगदी तुटपुंज्या वेतनावर जीव धोक्यात घालून काम करतात. त्यांच्या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका नादुरुस्त होत आहेत; त्यामुळे रुग्णवाहिका सेवा मिळविणे जिल्हावासियांना अतिशय अवघड होऊन बसले आहे. मृत व्यक्तीला स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी पंधरा हजार रुपये मोजावे लागत आहेत. कष्टकरी गरीब आर्थ्रिक दुर्बल कुटुंबाने काय करायचे? त्यांना आज कोणी वाली नाही. त्यांच्या भावना आरोग्य यंत्रणेबाबत किती कठोर-संतप्त असतील ह्याचा प्रशासनाने विचार करावा. प्रशासनाने आता साचेबंद आणि राजकीय पुढाऱ्यांप्रमाणे उत्तरे देऊ नयेत. जीव गेल्यावरही मरण यातना देणारी यंत्रणा सुधारण्याची जबाबदारी कोणाची?

किमान रुग्णवाहिकेचा तरी खर्च शासनाने करावा; अशी जनतेची आर्त हाक बहिऱ्या प्रशासनाला ऐकू जाणार की नाही? हा आमचा सवाल आहे. काल एका रुग्णाच्या नातेवाईक महिलेने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. मनसेचे नेते जीजी उपरकर यांनाही तो मुद्दा निदर्शनास आणून दिला आहे. त्यावर त्वरित कडक कारवाई व्हायला पाहिजे. नव्हे आजच जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका सेवेचे दरपत्रक जाहीर करावे; जेणेकरून यापुढे जनतेची लूटमार थांबेल आणि ज्यांनी यापूर्वी लूटमार केली त्या लुटमारीविरुद्ध जनतेला तक्रारी करता येतील. 

आरोग्य यंत्रणा तात्काळ सुस्थितीत आणण्यासाठी प्रशासनाने आकाश पातळ एक करावे, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे आवश्यक गोष्टींची जाहीर मागणी करून त्याचा पाठपुरावा करावा. त्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती-संस्था यांचे सहकार्य घेण्यास कमीपणा मानू नये. लोक तडफडून मरताहेत आणि आम्ही फोटोशेशन करण्यात मग्न असू तर ती गंभीर गोष्ट आहे. ते काम राजकीय पुढाऱ्यांना शोभते आणि ते त्यांनी करावे; कारण त्यांना पुन्हा पुन्हा निवडून यायचे असते. प्रशासनाला तसे करून चालणार नाही; कारण जनता मालक आहे. एकही मृत्यू आरोग्य यंत्रणेच्या असुविधेमुळे होता काम नये. जनतेच्या मनात प्रचंड संताप आहे. तो व्यक्त झाल्यास फारच कठीण होऊन बसेल! आता तरी जागे व्हा! 

-संतोष नाईक 

सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी