मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ
सिंधुदुर्गनगरी:- शासन सर्वसामान्य गरीब जनता नजरेसमोर ठेवून त्यांच्या गरजेच्या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करत आहे. राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य गरीब स्वावलंबी आणि समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हिच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेव्दारे माझ्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. प्रत्येक घटकाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याने आमचे सरकार हे सामान्य जनतेचे सरकार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर म्हणाले.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथील शिवछत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी येथे पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती. या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक महिलांनी हा कार्यक्रम पाहिला. यावेळी व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, प्रभाकर सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भोसले आदी उपस्थित होते.
श्री. केसरकर म्हणाले, सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. भावालाही मदत करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. जनतेची सेवा हेच शासनाचे ध्येय असून प्रत्येक योजना यादृष्टीनेच गतीने राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सिंधुरत्न योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून भगिनींना स्वत:च्या पायावर उभे करायचे आहे. सिंधुरत्न योजनेचा देखील महिलांनी लाभ घ्यावा. राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ केली आहे. आता प्राथमिक विद्यालयातील शिक्षण सेवकांना १६ हजार, माध्यमिकसाठी १८ हजार तर उच्च माध्यमिकसाठी ते २० हजार रूपये इतके मानधन करण्यात आले आहे. जर्मनीमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम मोफत वर्ग सुरू करण्यात आले आहेत. जर्मन शिकल्यामुळे सिंधुदुर्गातील युवकाचे जर्मनी येथे नोकरी करण्याचे स्वप्न पुर्ण होणार आहे असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. तावडे म्हणाले की, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजनेमुळे लाभ होणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यात येईल. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका ते सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले.
श्री. सावंत म्हणाले, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ पोहचविणे हे शासनाचे उद्दिष्ट्य आहे. हे शासन केवळ योजना जाहीर करत नसून त्या योजना गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहचवित असल्याने अनेक घटकांचा विकास होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आज जिल्ह्यात तळागाळात पेाहचली आहे. संबंधित यंत्रणांनी हा लाभ मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत असेही ते म्हणाले.