सिंधुदुर्गात नोंदणीकृत मतदार किती आहेत?
सिंधुदुर्गात निवडणूक मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर!
१ जाने २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्याला मतदार नोंदणी करता येणार! १० नोव्हें. पर्यंत विशेष ग्रामसभा!
सिंधुनगरी (हेमलता हडकर):- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ६९ हजार ५९८ एवढे मतदार असून ९ डिसेंबर २०२३ पर्यंत मतदार नोंदणी दुरुस्ती व वगळणे यासाठी विशेष मतदान नोंदणी कार्यक्रम निवडणूक विभागाकडून राबविला जात आहे. १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. १ जानेवारी २०२४ या अहर्ता दिनांकावर अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या नवीन मतदाराला मतदार नोंदणी करता येणार असून नव मतदार नवीन नोंदणी तसेच सर्व मतदारानी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट असल्याबाबत खात्री करून घ्यावी व दुरुस्ती करून घ्यावी; असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री किशोर तावडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी सिंधुदुर्ग चे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड हे उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव मतदारांचे प्रमाण हे जास्त असून १८ ते १९ वयोगटातील लोकसंख्या प्रमाण ३.४४% आहे. मात्र यातील १.०५ टक्के मतदारांनी नोंदणी केली आहे. या वयोगटातील नव मतदारानी नोंदणी करावी; असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
१ जानेवारी २०२४ या दिवशी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला मतदार नोंदणी करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे नव मतदारांनी आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी; ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने मतदान नोंदणी करता येईल; असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
विशेष ग्रामसभेचे आयोजन-
नव मतदार नोंदणी, नव्याने लग्न होऊन आलेल्या स्त्रिया, कायमस्वरूपी वास्तव्यास आलेले नागरिक, स्थलांतरित व्यक्ती अशा स्वरूपातील मतदान नोंदणी मधील दुरुस्त्या, नाव व मतदार संघातील बदल अशा स्वरूपातील दुरुस्त्या या काळात होणार असून त्यासाठी प्रत्येक गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. २७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२३ या काळात विशेष ग्रामसभा होणार आहेत. या ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन होणार असून मयत अथवा बाहेरगावी गेलेल्या मतदारांची नाव नोंदणी वगळणे, मतदारांचे दुरुस्ती व मतदार यादीत नाव नसल्यास नवीन नाव दाखल करणे; याबाबतचे पूर्णनिरीक्षण कार्यक्रम या ग्रामसभेत होणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ग्रामसभेत सहभाग घेऊन आपल्या मतदार यादीतील नावाची व तपशिलाची खात्री करावी व त्यात दुरुस्तीची गरज असेल तर करून घ्यावी; असे आवाहनही जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.
आजमितीस सिंधुदुर्गात ६ लाख ६९ हजार ५९८ मतदार-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ जानेवारी २०२३ च्या अंतिम यादीनुसार जिल्ह्यात एकूण ६ लाख ६९ हजार ५९८ एवढे मतदार आहेत. त्यात ३ लाख ३३ हजार ९८७ पुरुष मतदार व ३ लाख ३५ हजार ६११ स्त्री मतदार असून पुरुषांच्या तुलने स्त्री मतदार जास्त आहेत.
२७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर विशेष मोहीम-
निवडणूक विभागाने २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर या काळात ही विशेष मोहीम राबविली असून नव मतदार तसेच दुरुस्ती असलेल्या मतदारांनी या काळात खात्री करून घ्यावी; असे आवाहनही जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.