`समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेचे आदर्शवत मदतकार्य!

देवगड (प्रतिनिधी):- कोरोना महामारीच्या काळात विजयदुर्ग पंचक्रोशीत `समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेने मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक मदत केली असून त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या आणि निराधार लोकांना दिलासा मिळाला आहे.

समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष व रामेश्वर गावचे सुपुत्र श्री. योगेश शशिकांत नाटेकर यांच्यावतीने ग्रामपंचायत रामेश्वर व रामेश्वर कोविड समिती यांच्या माध्यमातून रामेश्वर गावातील गरजू गरीब तीस कुटुंबांना मास्क, हँडवॉश, सॅनिटायझर आणि अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे त्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. शासनामार्फत रेशनवर गहू व तांदूळ दिले जातात; परंतु कडधान्य, डाळी व इतर जीवनावश्यक वस्तू घेणे ग्रामीण भागात गरीब कुटुंबांना आर्थिक अडचणीचे ठरत आहे. ही समस्या लक्षात घेऊन समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष श्री. योगेश नाटेकर यांनी निराधारांना कडधान्य, डाळी व इतर जीवनावश्यक वस्तू दिल्या.

त्याचप्रमाणे रामेश्वर ग्रामपंचायत, रामेश्वर गावातील कोविड समिती, गिर्ये ग्रामपंचायत आणि विजयदुर्ग पोलीस स्टेशन कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी आणि कोविड योद्धे ह्या सर्वांना एन-९० माक्स व सॅनिटाइजर तसेच पल्स ऑक्सिमीटर, बीपी मशीन देऊन `समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेने आदर्शवत कार्य केलेले आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या वस्तू वाटप कार्यक्रमास अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे एपीआय कर्णे साहेब, भालेराव साहेब, सरपंच विनोद सुके, उपसरपंच विल्यम फर्नांडिस, सुरेश केळकर, प्रकाश पुजारी, प्रवीण पवार, पोलिस पाटील दुधवडकर, नासीर मुकादम, महेंद्र घारकर, रविंद्र धावरे, बाबु टुकरुल, प्रशांत केळकर, अनिल घारकर,संतांन फर्नांडिस तसेच रामेश्वर कोविड कमिटी सदस्य उपस्थित होते.

`समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई’ यांच्यावतीने विजयदुर्ग ग्रामपंचायत येथे आरोग्य विषयक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यावेळी उपसरपंच श्री. महेश बिडये यांनी आभार मानताना त्यांनी ट्रस्ट तसेच विशेषतः क्षा. म. समाजाचा उल्लेख केला. `महाआरोग्य शिबिराचा शेकडो ग्रामस्थांना लाभ झाला. हा संपूर्ण समाज समाजसेवेच्या कार्यात नेहमी अग्रेसर असतो. समाजकार्यात यांची एकी वाखाण्याजोगी असते. रामेश्वर गावाचे सरपंच विनोद सुके आणि कोविड समिती यांनी गावात कोरोना रोखण्यासाठी घेतलेला निर्णय त्यांच्या ह्या निर्णयाला समाज बांधवांनी पक्ष भेदभाव विसरून दिलेली साथ खरोखर कौतुकास्पद आहे. हा क्षा. म. समाजाच्या सामाजिक कार्याचा गौरव आहे. अशीच समाजपयोगी कार्य घडत राहो!’ ‘ असेही त्यांनी सांगितले.

`समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई’ ही स्वयंसेवी संस्था गेली पंधरा वर्षे विद्यार्थांना-शाळांना वह्या-पुस्तके, शैक्षणिक साहित्य दरवर्षी देत असते. त्याचप्रमाणे संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यात येतात. अशाप्रकारे `स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई’ ह्या संस्थेचे समाजपयोगी कार्य कौतुकास्पद आहे.