स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा
नवी दिल्ली:- भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी समूह राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण झाले. यावेळी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथसंचलनही झाले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, श्रीमती स्मिता शेलार, निवासी अभियंता जे.डी. गंगावार, उप अभियंता (विद्युत) आशुतोष द्विवेदी, महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भागवंती मेश्राम, तसेच महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दोन्ही सदनात निवासास असणारे अतिथी तसेच दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
दरम्यान, राजधानीतील लाल किल्ल्यावर आयोजित मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांनी देशाला संबोधित केले. देशभरातून विविध क्षेत्रातील 1800 लोक या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाले. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.