भारताला गतवैभव परत मिळवायचंय! -पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवीदिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पारंपरिक कुर्ता आणि चुडीदार पायजमा परिधान केला होता. त्यांनी परिधान केलेल्या फेट्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले… त्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे…

खूप खूप शुभेच्छा!
एवढा मोठा देश, १४० कोटी माझ्या बंधू-भगिनींनो, माझे कुटुंबीय… आज स्वातंत्र्याचा सण साजरा करत आहेत. देशातील करोडो लोकांना, भारतावर प्रेम करणार्‍या आणि भारताचा आदर करणार्‍या करोडो लोकांना मी या महान सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

मी पुन्हा येईन!
२०१४ मध्ये मी तुम्हाला परिवर्तन घडेल असं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला या सर्वोच्च पदावर बसवलं. २०१९ मध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि आशीर्वाद दिला. आता २०२४ साठीही मला आशीर्वाद द्या. पुढच्या १५ ऑगस्टला मी पुन्हा तुमच्यासमोर येईन. याच लालकिल्ल्यावरून मी देशाने मिळवलेले यश, तुमचे सामर्थ्य, तुमचे संकल्प, त्यामध्ये झालेली प्रगती, त्याचे गौरवगान अधिक आत्मविश्वासाने मी प्रस्तृत करेन. मी तुमच्यासाठीच जिंकतो आहे, जिंकेन.

सगळे भारतीय माझं कुटुंब!
मी जे कष्ट उपसतो आहे ते तुमच्यासाठीच आहेत. कारण सगळे भारतीय हे माझं कुटुंब आहेत. मी तुमचं दुःख सहन करु शकत नाही.

देश मणिपूरच्या पाठिशी!
मणिपूरमध्ये आणि हिंदुस्थानच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. देश मणिपूरच्या पाठिशी आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार आहे. मणिपूरमध्ये केंद्र आणि राज्य सरकार शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि करत राहू.

बदलत्या जगाला भारत आकार देणार!
आज देशातील तरुणांना जेवढे भाग्य लाभले आहे तेवढे क्वचितच कुणाला मिळते.आपण ते गमावू नये. येणारा काळ हा तंत्रज्ञानाच्या प्रभावाचा असणार आहे. आपली छोटी शहरे आणि शहरे लोकसंख्येच्या दृष्टीने लहान असतील पण त्यांची क्षमता कोणापेक्षाही मागे नाही. देशात संधींची कमतरता नाही. आपल्याला पाहिजे तितक्या संधी देण्याची क्षमता या देशामध्ये आहे.बदलत्या जगाला भारत आकार देणार आहे.

पाच वर्षात साडेतेरा कोटी भारतीयांना गरीबीतून वर आणलं!
आमच्या सरकारने पाच वर्षात साडेतेरा कोटी भारतीयांना गरिबीतून वर आणलं. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी आम्ही विश्वकर्मा योजना आणत आहोत. १३ ते १५ हजार कोटींनी त्याची सुरुवात करणार आहोत.

अडीच लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले!
पीएम किसान योजनेतून आम्ही अडीच लाख कोटी रुपये या देशाच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.

जलजीवन मिशनसाठी दोन लाख कोटी रुपये खर्च!
आम्ही जलजीवन मिशनसाठी दोन लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.

आयुष्यमान भारत योजनेसाठी ७० हजार कोटींचा निधी!
आयुष्यमान भारत योजनेसाठी, गरीबांना उपचार मिळावेत, औषधं मिळावीत म्हणून ७० हजार कोटींचा निधी दिला आहे.

पशूधन संवर्धनासाठी १५ हजार कोटी रुपये खर्च!
पशूधन संवर्धनासाठी १५ हजार कोटी रुपये आपण खर्च केले आहेत. आज भारतीयांना मी सांगू इच्छितो की जनऔषध केंद्रांनी देशातल्या मध्यमवर्गींयांना नवी ताकद दिली. जर एखाद्याला मधुमेह झाला तर महिन्याला ३ हजार रुपये औषधं लागतात. जनऔषध केंद्रातून ते औषध आपण लोकांना दिलं आहे.

भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर!
२०१४ मध्ये जेव्हा आम्ही सत्तेत आलो तेव्हा भारताची अर्थव्यवस्था जगात दहाव्या क्रमांकावर होती. आज भारतीयांच्या अथक परिश्रमामुळे आपण जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत. ही बाब अशीच झालेली नाही. भ्रष्टाचाराच्या राक्षसाने देशाला आपल्या पकडीत घट्ट धरुन ठेवलं होतं. लाखो-करोडो रुपयांचे घोटाळे होत होते. त्यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. आपण या गोष्टी बंद केल्या. गरीब कल्याणासाठी आम्ही निर्णय घेतले. देश जेव्हा आर्थिक दृष्ट्या मजबूत होतो तेव्हा तिजोरी भरत नाही. तर देश आर्थिक दृष्ट्या मजबूत होतो.

दहा वर्षांचा हिशोब देतो आहे!
मी देशवासीयांना दहा वर्षांचा हिशोब देतो आहे. दहा वर्षांपूर्वी ३० लाख कोटी रुपये राज्यांना जात होते. मागच्या ९ वर्षात हा आकडा १०० लाख कोटींच्या पुढे गेला आहे. गरीबांच्या घरांसाठी ९० हजार कोटी खर्च व्हायचे. आता चार लाख कोटींपेक्षा जास्त गरीबांच्या घरांसाठी दिले गेले आहेत. युरिया शेतकऱ्यांना स्वस्त मिळावा म्हणून १० लाख कोटींची सबसिडी शेतकऱ्यांना देतं आहे. मुद्रा योजना स्वयंरोजगारासाठी २० लाख कोटी रुपये दिले जात आहेत. आठ कोटी लोकांनी नवा व्यवसाय सुरु केला आहे. प्रत्येक व्यावसायिकाने एक ते दोन लोकांना रोजगार दिला आहे. मुद्रा योजनेमुळे हा फायदा झाला आहे. MSMES ना साडेतीन लाख कोटींची मदत करुन करोना काळात त्यांना आपण ताकद दिली. वन रँक वन पेन्शनसाठी ७० हजार कोटी हे लष्कराच्या निवृत्त नायकांसाठी देण्यात आले आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपण आधीच्या तुलनेत काही पटींनी जास्त निधी दिला आहे. देशाचा विकास झाला पाहिजे, कानाकोपऱ्यात रोजगार निर्माण करण्यासाठी आम्ही काम केलं आहे.

`रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’ या तत्त्वावर देश पुढे जातो आहे!
२०१४ मध्ये आणि २०१९ मध्ये जनतेने सरकार फॉर्म केलं त्यामुळे माझ्यात रिफॉर्म करण्याची हिंमत आली. त्यानंतर ब्युरोक्रसीने परफॉर्म केलं. जनता जनादर्नाची साथ लाभली त्यामुळे ट्रान्सफॉर्म होतानाही दिसतो आहे. आपला विचार हा एक हजार वर्षांचा पाया मजबूत करणारा आहे. जलशक्ती मंत्रालय आम्ही तयार केलं. हे मंत्रालय आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला पिण्याचं शुद्ध पाणी पोहचवणं, पर्यावरणातल्या घटकांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी काम करतं आहे. आपलं सामर्थ्य जर आपण नाकारलं तर जग कसं काय स्वीकारणार? मत्स्यपालन, पशूपालन, डेअरी यासाठी वेगळी खाती तयार केली. त्या लोकांना न्याय देण्याचं कामही आम्ही सरकार म्हणून करतो आहे. सहकारातून समृद्धीकडे आपल्याला जायचं आहे त्यामुळेच आम्ही सहकार मंत्रालयही स्थापन केलं आहे.

माणुसकीपेक्षा मोठं काही नाही हे आपल्याला या काळाने शिकवलं!
करोना काळानंतर संपूर्ण जग एका वेगळ्या पद्धतीने विचार करु लागलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाने एक वेगळा आकार घेतला होता. आता करोना काळानंतर नव्या जिओ पॉलिटिकल इक्वेशनच्या दिशेने जग वळतं आहे. माझ्या कुटुंबीयांना अभिमान वाटेल की तुमचं सामर्थ्य जगाला आकार देतं आहे. आपण सगळेच जण एका निर्णायक ठिकाणावर आहोत. करोना काळात भारताचं सामर्थ्य काय आहे ते जगानं पाहिलं आहे. जगातली अर्थव्यवस्था कोलमडली होती. अनेक महासत्तांवर दबाव होता त्यावेळी आपण देश म्हणून जगाचा विचार केला. जो मानवकेंद्री होता. मानवी संवेदना सर्वात मोठी असते; हे कोव्हिडने आपल्याला शिकवलं आहे. माणुसकीपेक्षा मोठं काही नाही हे आपल्याला या काळाने शिकवलं आहे.

जगाला भारताविषयी जाणून घ्यायचं आहे!
भारताचं सामर्थ्य दिवसेंदिवस वाढतं आहे. जगाचा देशावर विश्वास वाढतो आहे. G20 परिषदेचं यजमानपद आपल्याला मिळालं आहे. मागच्या वर्षभरापासून विविध आयोजनं करण्यात आली. या कार्यक्रमांनी सामान्य माणसाचं सामर्थ्य काय आहे ते जगाला दाखवलं आहे. भारतात किती विविधता आहे ते दाखवून दिलं आहे. अशा कार्यक्रमांमुळे जगाला भारत काय आहे? ते जाणून घ्यायचं आहे.

देश सामर्थ्यशाली होतोय कारण भारतीयांचं योगदान!
आपला देश आधुनिकतेकडे वळला आहे. जगातल्या सामर्थ्यशाली देशांमध्ये आपल्या देशाची गणना होऊ लागली आहे. याचं कारण आपल्या देशातल्या शेतकऱ्यांनी केलेले अपार कष्ट, मजूर आणि श्रमिक यांनी दिलेलं योगदान, महिला, मुली यांचं योगदान यांच्या सगळ्यांच्या एकत्रित शक्तीमुळेच देश प्रगती पथावर जातो आहे. मी या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. आपल्या देशाला पुढे नेण्यात, प्रगती पथावर नेण्यासाठी इंजिनिअर, डॉक्टर्स, शिक्षक, विद्यापीठं, गुरुकुल या सगळ्यांचंही मोठं योगदान आहे. हे सगळे जण भारतमातेचं सामर्थ्य वाढवत आहेत.

देशात कुठल्याही संधींची कमतरता नाही!
आज छोट्या छोट्या गावातली मुलं, मुली खेळाडू म्हणून पुढे येत आहेत. सॅटेलाइट तयार करुन विद्यार्थी तो आकाशात सोडण्यासाठी सज्ज आहे. मी देशाच्या युवकांना सांगू इच्छितो की आपल्या देशात संधींची कमी नाही. तुम्ही जितक्या संधी मागाल त्यापेक्षा जास्त संधी देण्याची क्षमता आपल्या देशात आहे.

डिजिटल इंडियाची संपूर्ण जगाला भुरळ!
मी काही दिवसांपूर्वी बाली या ठिकाणी गेलो होतो. तिथे विविध देशांचे प्रतिनिधी आले होते. मला त्यांनी डिजिटल इंडिया विषयी प्रश्न विचारले. दिल्ली, मुंबई, चेन्नई पर्यंतच आमची युवाशक्ती काम करत नाही. तर जगाला त्याची भुरळ पडली आहे. आपल्या देशातली काही शहरं आणि गावं छोटी आहेत, तिथली लोकसंख्या कमी आहे. मात्र स्वप्न पाहणं, नवनिर्मिती करणं यात कुठेही कुणीही कमी पडलेलं नाही.

आपल्याला देशाचं गतवैभव परत मिळवायचंय!
आपल्या देशाचं गतवैभव आपल्याला परत मिळवत आपल्याला उभं राहायचं आहे. आपण जो निर्णय घेऊ, जे पाऊल उचलू त्याचा परिणाम पुढच्या एक हजार वर्षांपर्यंत आपली दिशा निर्धारित करणार आहे. माझ्या देशाच्या युवकांना, युवतींना सांगू इच्छितो की तुम्ही भाग्यवान आहात. आज तुम्ही हा काळ पाहता आहात. युवाशक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे. आमच्या सरकारची नीतीही युवाशक्तीला बळ देणारी आहे. आपल्या देशाच्या युवकांनी पहिल्या तीन स्टार्ट अप सिस्टीममध्ये स्थान मिळवून दिलं आहे. सगळं जग टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे. अशात भारताच्या युवकांची जी हुशारी आहे त्याचं वेगळं स्थान असणार आहे.

संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहतो आहे!
सध्या आपण अशा कालखंडात आहोत की जो भारताचा अमृतकाळ आहे. या कालखंडात आपण जे करु, जी पावलं उचलू, जितका त्याग करु, एका पाठोपाठ एक निर्णय घेऊ त्यानंतर येणाऱ्या एक हजार वर्षांचा इतिहास त्यामुळे लिहिला जाणार आहे. पुढच्या हजार वर्षांवर आजच्या घटनांचा प्रभाव राहणार आहे. नव्या आत्मविश्वासाने आपला देश पुढे जातो आहे. नवे संकल्प करतो आहे. भारतमाता उर्जाची सामर्थ्य होती, पण गुलामीत अडकली होती. आता तो काळ संपला. मागच्या ९ ते १० वर्षात भारताविषयी, सामर्थ्याविषयी जगाला आकर्षण निर्माण झाली आहे.

घटनांचा प्रभाव हितकारक आणि अहितकारक!
आपण जेव्हा इतिहासाकडे वळून पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की इतिहासात अशा काही गोष्टी घडल्या आहेत, ज्या गोष्टी छाप सोडून गेल्या. त्याचा प्रभाव युगांपर्यंत राहतो. सुरुवातीला ती कदाचित छोटीशी घटना वाटते. पण पुढे ती अनेक समस्यांचं मूळ होते. हजार वर्षांपूर्वी देशावर आक्रमण झालं. एका राजाचा पराभव झाला. ही एक घटना एक हजार वर्षांच्या गुलामगिरीत भारताला नेऊ शकेल हे वाटलंही नव्हतं. त्यानंतर गुलामी वाढतच गेली. देशावर आक्रमणं वाढली. ही घटना छोटी होती पण एक हजार वर्षांचा प्रभाव पडला. मी आज तुम्हाला हे सांगतो आहे कारण भारताच्या स्वातंत्र्यवीरांनी या कालखंडात देशाच्या स्वातंत्र्याची मशाल पेटती ठेवली. भारतमातेला ज्या बेड्या पडल्या होत्या त्या सोडवण्यासाठी सगळे लोक मग त्या महिला, मजूर, शेतकरी या सगळ्यांनीच स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न प्रत्यक्षात आलं आहे.

गणराज्य दिवसाचं ७५ वं वर्ष!
या वर्षी आपण जो गणराज्य दिवस साजरा करणार आहोत. त्या दिवशी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्र निर्माणासाठी नवी प्रेरणा, नवे संकल्प आपण करत आहोत. आज माझ्या कुटुंबाला म्हणजेच माझ्या देशाला मी सांगू इच्छितो की नैसर्गिक संकटांमुळे देशात अनेक ठिकाणी आपत्ती आल्या. या आपत्ती ज्यांना सहन कराव्या लागल्या मी त्या सगळ्यांच्या प्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. राज्य आणि केंद्र सरकार त्यांच्या पाठिशी आहे हा विश्वास त्यांना देऊ इच्छितो.

मीराबाई यांच्या जयंतीचं ५२५ वं वर्ष!
आज १५ ऑगस्ट हा महान क्रांतीकारक श्री अरविंदो यांची जयंती आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या १५० व्या जयंतीचं वर्ष आहे. राणी दुर्गावतीच्या ५०० व्या जयंतीचं वर्ष आहे. संपूर्ण देश हा उत्सव साजरा करणार आहे. संत मीराबाई ५२५ व्या जयंतीचंही हे पावन पर्व आहे.

देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना नमन!
लोकसंख्येच्या दृष्टीने आपला देश हा क्रमांक एकवर आहे. आज आपला देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो आहे. भारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आज मी शुभेच्छा देतो. ज्या वीरांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून योगदान दिलं, आपल्या प्राणांचीही आहुती दिली त्यांना मी नमन करतो. त्यांचं बलिदान, त्यांचं योगदान खूप मोठं आहे म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे त्यांच्याविषयी माझ्या मनात आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात आदर आहे.

गावात २ कोटी ‘लखपती दीदी’ बनवण्याचं स्वप्न!
बँकांपासून ते अंगणवाड्यांपर्यंत असं एकही व्यासपीठ नाही की, ज्यामध्ये महिला योगदान देत नसतील. आता माझं स्वप्न गावांमध्ये २ कोटी लखपती दीदी बनवण्याचं आहे. त्यासाठी आम्ही एक नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये 15 हजार महिला बचत गटांना ड्रोन चालवण्याचं आणि दुरुस्त करण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. यामुळे ग्रामीण महिलांचं सक्षमीकरण होईल आणि देशाचं कृषी तंत्रज्ञान क्षेत्र मजबूत होईल. माता, भगिनी आणि मुलींना मी सांगू इच्छितो की, माझ्या माता-भगिनींच्या बळावर आज देशाची प्रगती झाली आहे. आज देश प्रगतीच्या मार्गावर आहे, त्यामुळे हे सर्वांचेच प्रयत्न आहेत. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो.” होय, तुमच्या मेहनतीमुळेच आज देश कृषी क्षेत्रात प्रगती करत आहे.

जगभरातील तरुणांना वाटतंय आश्चर्य!
देशाच्या युवा शक्तीवर माझा विश्वास आहे. युवाशक्तीमध्ये क्षमता आहे आणि त्याच युवाशक्तीला अधिक बळ देण्याचं आमचं धोरण आहे. आपल्या देशातील तरुणांनी भारताला जगातील पहिल्या ३ स्टार्टअप इकोसिस्टममध्ये स्थान मिळवून दिलं आहे. आज जगभरातील तरुण भारताची ही क्षमता पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.

२०४७ ला स्वातंत्र्याची १०० वर्षे!
आज देशात दहशतवादी हल्ले कमी झाले आहेत, नक्षलवादी घटना आता भूतकाळात घडल्या आहेत. हे कार्यरत सरकार आहे, हा नवा भारत आहे.. हा भारत थांबत नाही आणि दमत नाही. येत्या पाच वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, ही मोदींची हमी आहे. २०४७ साली जेव्हा देश स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करत असेल, तेव्हा भारताचा तिरंगा विकसित भारताचा तिरंगा ध्वज व्हायला हवा! आमची धोरणे स्पष्ट आहेत, हेतूवर प्रश्नचिन्ह नाही पण काही मुद्दे आहेत ज्यावर मी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशातील जनतेकडून मदत आणि आशीर्वाद मागत आहे. राष्ट्रपिता महात्मा असा भारत आपल्याला घडवायचा आहे!

भ्रष्टाचार, कुटुंबवाद आणि तुष्टीकरण विरोधी लढाई आवश्यक!
काही विकृती आपल्या समाजव्यवस्थेत शिरल्या आहेत. संकल्प सिद्ध करायचा असेल, तर तिन्ही वाईट गोष्टींशी लढणे ही काळाची गरज आहे. भ्रष्टाचाराच्या किडीने देशाच्या सामर्थ्याला पोखरलं आहे. भ्रष्टाचारापासून मुक्ती, त्याविरुद्ध लढा. भ्रष्टाचाराविरुद्ध मी लढत राहीन. दुसरे म्हणजे, कुटुंबवादाने आपला देश उद्ध्वस्त केला आहे. देशातील जनतेचे हक्क हिरावून घेतले आहेत. तुष्टीकरणाने देशाच्या मूळ विचारसरणीलाही कलंक लावला आहे. म्हणूनच प्रिय कुटुंबियांनो, या तीन वाईट गोष्टींविरुद्ध आपल्याला ताकदीने लढायचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या नवीन योजना:-
१. विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने लोकांसाठी विश्‍वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणा केली. विश्वकर्मा योजनेत १५ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
२. देशात आतापर्यंत १० हजार जन औषधी केंद्र होती. आता हे लक्ष्य २५ हजार औषधी केंद्राच केलं आहे. म्हणजे अजून १५ हजार जन औषधी केंद्र सुरु होतील. ही मोदीची गॅरेंटी आहे, पुढच्या पाच वर्षात भारताचा पहिल्या टॉप ३ अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होईल.
३. शहरात जे लोक भाड्याच्या घरात राहतात. ज्यांच्याकडे स्वत:च घर नाही. जे अनधिकृत कॉलनीमध्ये राहतात. घर घेण्यासाठी बँकांकडून लोन मिळतं. त्यांना व्याजात सवलत दिली जाईल. त्यासाठी लवकरच घोषणा केली जाईल.
४. माझ लक्ष्य गावांमध्ये २ कोटी लखपती दीदी बनवायच आहे. एग्रीकल्चर सेक्टरच्या माध्यमातून आम्ही वुमेन सेल्फ हेल्प ग्रुपची ट्रेनिंग देऊ. यात महिलांना ड्रोन चालवण्याच प्रशिक्षण देण्यात येईल. आम्हाला गावात महिलांना मजबूत करायच आहे. ग्रामीण भागांत दोन कोटी लक्षाधीश महिला तयार करण्यासाठी ड्रोन योजना राबविणार. शेती क्षेत्रात तंत्रज्ञान यावं यासाठी महिला बचत गटाच्या सदस्यांना आम्ही ड्रोन चालवण्याचं, दुरुस्त करण्याचं प्रशिक्षण देणार आहोत. अशा हजारो महिलांना भारत सरकार ड्रोन देईल. त्याची सुरुवात आम्ही १५ हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून करणार आहोत.
५. आज भारत अभिमानाने सांगू शकतो की सर्वाधिक महिला वैमानिक भारतात आहेत. 2 कोटी करोडपती दीदींचे टार्गेट घेऊन आम्ही काम करत आहोत. महिला शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. भारताला पुढे नेण्यासाठी एक अतिरीक्त शक्तीची मदत होणार आहे. ती म्हणजे देशाची महिला शक्ती आहे. संपूर्ण जगातील सर्वाधिक महिला वैमानिक भारतात आहे. चांद्रयान असो किंवा चांद्र मोहिम यातही महिला वैज्ञानिकांचे योगदान मोठे आहे. नारी शक्तीला आर्थिक सक्षमतेला प्रोत्साहन देत आहोत. जी २० मध्येही सर्व जगाने याला मान्यता देत कौतुक केले आहे. याला पाठबळही देत आहेत.

You cannot copy content of this page