भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय, `मसूद अझहर’ आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

पाचव्यावेळी चीनचे नमते, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केली घोषणा

जीनिव्हा:- मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आज घोषणा केली आहे. सदर घोषणेमुळे भारताच्या दहशतवादी विरोधी प्रयत्नांना यश आले असून भारताच्या मुत्सद्देगिरीचा हा मोठा विजय मानला जातोय.

‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याला अखेर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत आज या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. जगातील अनेक देशात ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने दहशतवादी कारवाया केल्या. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये मसूद अजहर म्होरक्या असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावं, अशी मागणी करून सर्व देशांकडे सहकार्य मागितले; परंतु चीनने नेहमीच आपला विशेष अधिकार वापरून भारताच्या मागणीला विरोध केला होता. २००९ पासून गेल्या दहा वर्षांत चारवेळा मसूदला दहशतवादी ठरविण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघापुढं भारतातर्फे ठेवण्यात आला होता. पाकिस्तानला वाचविण्यासाठी व भारतावर राजकीय कुरघोडी करण्यासाठी चीननं चार वेळा नकाराधिकार वापरून भारताचा प्रस्ताव हाणून पाडला होता.

तरीही भारताने प्रयत्न सुरूच ठेवले होते. पुलवामा येथील हल्ला आणि श्रीलंकेतील आत्मघाती स्फोटांनंतर अमेरिका, फ्रान्स व ब्रिटननंही चीनवर दबाव वाढविला आणि चीनला नमते घेणे भाग पडले. ह्या निर्णयाचं भारतानं स्वागत करून सर्व देशांचे आभार मानले आहेत.

मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे भारताचा दहशतवाद्यांविरुद्धच्या लढाईला जागतिक पाठींबा मिळाला. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन यांना एकाच वेळी चपराक बसली आहे. भारताच्या मुत्सद्दीगिरीचा हा विजय आहे, असं आंतरराष्ट्रीय संबंध तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *