न्या. धर्माधिकारी यांच्या विचारधनाचा ग्रंथरुपाने संग्रह व्हावा : मुख्यमंत्री
दिवंगत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांना शोकसभेत विविध मान्यवरांची श्रद्धांजली
मुंबई-: दिवंगत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी एका जीवनात अनेक जीवन जगले. हेच त्यांच्या जगण्याचे वैशिष्ट होते. पुढील पिढ्यांसाठी त्यांचे विचारधन मार्गदर्शक ठरावे यासाठी त्यांच्या लेखन, भाषणांचा संग्रह पुस्तकरुपाने करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ सभागृहात ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, आमदार नीलम गोऱ्हे, धर्माधिकारी कुटूंबिय तसेच विधी तसेच अन्य क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री म्हणाले, महापौर झाल्यानंतर त्यांना भेटण्याचा पहिल्यांदा योग आला. त्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाने आणि विचार मांडण्याच्या शैलीमुळे आपण खूपच प्रभावित झालो. त्यानंतर त्यांच्या अनेकदा भेटी झाल्या. हाती घेतलेले समाजकार्य प्रामाणिकपणे पार पाडल्यास तुम्हाला कधीही मागे वळून बघायची गरज भासणार नाही हा संदेश न्या. धर्माधिकारी यांनी समाजाला दिला. गांधीजींच्या विचारांचा पगडा शेवटपर्यंत त्यांच्यावर होता. गांधीजींचे विचार जगण्याचे काम त्यांनी केले. शासनाच्या विविध समित्यांवर त्यांनी अत्यंत तळमळीने काम केले. त्यांच्या विविध शिफारशी मला मुख्यमंत्री या नात्याने स्वीकारता आल्या.
त्यांचे विचारधन पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल यासाठी धर्माधिकारी कुटूंबियांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यासाठी शासन मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. सरकार म्हणून आम्हाला विकास हवा आहे तो न्यायमुर्तींच्या पर्यावरणपूरक भूमिकेला समर्पक असाच असेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.यावेळी विविध मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
आमदार श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांची अंमलबजावणी कशी करावी याचे मार्गदर्शन त्यांनी वेळोवेळी केले. डॉ. अभय बंग म्हणाले, त्यांच्या जाण्याने स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीचा गांधीवादी साक्षीदार हरपला आहे. डॉ. श्री. अनिल काकोडकर म्हणाले, वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून पर्यावरणपूरक ग्रामीण विकास कसा साधला जावू शकतो ही संकल्पना त्यांच्यामुळे अस्तित्वात आली. ग्रामीण भागाच्या विकासासाठी नवी रचना निर्माण करण्याची त्यांची धडपड होती. ग्रामीण भागाच्या विकासाचे स्वप्न पुढे नेणे हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
श्री. फादर फ्रान्सिस दिब्रिटो म्हणाले, त्यांच्या जाण्याने एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व आपल्यातून हरवले आहे. अनियंत्रित तृष्णेच्या मागे सर्व समस्याची मूळं असतात हे त्यांचे अनुकरणीय आहेत. श्री. विजय कुवळेकर म्हणाले, संस्कार हा आचरणातून व्हावा, उपदेशातून नको हा विचार त्यांनी दिला. चांगल्याच्या कायम पाठीशी राहीलेली व्यक्ती होते. आणीबाणी विरोधी निकाल देवून त्यांनी त्याची किंमत मोजली मात्र, तत्त्वांशी प्रतारणा केली नाही. अशा माणसांची समाजाला कायम उणीव जाणवेल.ज्येष्ठ विधिज्ञ सायरस खंबाटा यांच्यासह अन्य व्यक्तींनी त्यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.
श्री. सत्यरंजन धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी धर्माधिकारी कुटूंबातील अन्य सदस्यही उपस्थित होते. शेवटी मान्यवरांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. भजनाने शोकसभेचा समारोप झाला.