सहकार नेते सुधाकर कदम यांच्या पाठपुरावा पाठपुराव्याने सह. गृहनिर्माण संस्थेतील गैरप्रकार उघड!
माहीम येथील सुरज एलीगंझा- १ ह्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत नियमबाह्य कामकाज!
मुंबई (प्रतिनिधी)- माहीम येथील सुरज एलीगंझा- १ ह्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत नियमबाह्य कामकाजाची आणि भ्रष्ट व्यवहाराची पोलखोल उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्या तपासणीमधून झाली असून यासंदर्भात सहकार नेते सुधाकर कदम यांनी केलेला पाठपुरावा उल्लेखनीय आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, सहकार नेते सुधाकर कदम यांच्याकडे माहीम येथील सुरज एलीगंझा- १ ह्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील गैरव्यवहार व नियमबाह्य कामकाजाप्रकरणी अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याआधारे सुधाकर कदम यांनी उपनिबंधक यांच्याकडे लेखी तक्रार करत पाठपुरावा केला. त्यानुसार उपनिबंधकांनी तपासणी अधिकारी नियुक्त करून सदर संस्थेची रीतसर तपासणी केली. सदर तपासणीमध्ये संस्थेच्या गैरकारभाराविरोधात ठपका ठेवण्यात आला आहे. संस्थेने कॅशबुक, जनरल लेजर, कर्ज खतावणी, इतर नोंदवह्या ठेवलेल्या नाहीत. तसेच संस्थेने नियमानुसार आदर्श उपविधी स्वीकारल्या नाहीत. थकबाकीदार सदस्यांविरोधात कोणतीही कारवाई न करणे, मासिक सभा न घेणे, लेखापरीक्षक नियुक्ती प्रक्रियेत त्रुटी ठेवणे असे अनेक चुकीचे प्रकार संस्थेत आढळले आहेत.
गैरप्रकारांबाबत सदस्यांनी विचारणा केली तर संस्थेचे अध्यक्ष- सचिव दादागिरी करायचे. काही पदाधिकारी सभासदांकडून बेकायदेशीर पैशाची मागणी करायचे, नियमबाह्य बिल आकारणी व व्याज आकारणी चुकीच्या पद्धतीने केली जायची. खोटा जमा खर्च सादर करणे, मर्जीतील लोकांना निविदा मंजूर करणे, संस्थेच्या एफडीवर कर्ज घेणे; असे गैरप्रकार करायचे! असे आरोप सदस्यांनी संस्थाचालकांवर केले होते. जे सभासद ह्या गैरप्रकाराविरोधात जाब विचारायचे त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्या जात होत्या व दहशत पसरविली जायची; असे आमच्या प्रतिनिधीकडे बोलताना संस्थेच्या काही सदस्यांनी सांगितले. याबाबत सुधाकर कदम यांनी रीतसर तक्रार दाखल करून संस्थेच्या कारभाराची लक्तरे वेशीवर मांडली. यासंदर्भात संस्था सभासदांनी त्यांचे आभार मानले आहेत.











