लोकसभा निवडणूक- मतदार जागृती हा निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक
पुणे:- मतदार जागृती हा निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असून स्वीप ( सिस्टेमॅटीक वोटर्स एज्युकेशन अॅण्ड इलेक्ट्रोरल पार्टीसिपेशन) कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास अपर जिल्हाधिकारी तथा शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय स्वीप समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उप जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यासाठी स्वीप समिती स्थापन करण्यात आली असून विविध कार्यालयांच्या माध्यमातून मतदार जागृतीचे कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वच विभागांनी राबविलेल्या उपक्रमांचे रमेश काळे यांनी कौतुक केले. प्रत्येक निवडणुकीचे वेगळे वैशिष्ट्य असते. या निवडणुकीत एकही मतदार मतदानापासून वंचित होऊ नये यासाठी भारत निवडणूक आयोगाने खास प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून या कामी यश येईल, असेही ते म्हणाले.
प्रारंभी प्रत्येक कार्यालयाने स्वीप उपक्रमांबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. लोकशाही पंधरवडा, जागतिक दिव्यांग दिन, जागतिक महिला दिन या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक, संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कार्यशाळा घेण्यात येऊन त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. बैठकीस उपजिल्हाधिकारी संतोष भोर, सहायक आयुक्त अण्णासाहेब बोदडे, शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, प्रवीण आष्टीकर आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.