महाराणा प्रतापसिंह कलादालनामुळे वैभववाडीच्या वैभवात भर

महाराणा प्रतापसिंह कलादालनामुळे वैभववाडीच्या वैभवात भर!

-पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल

वैभववाडी:- महाराणा प्रतापसिंह कलादालन व सांस्कृतिक केंद्राच्या उभारणीमुळे वैभववाडीच्या वैभवात भर पडली असल्याचे प्रतिपादन पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

वाभवे-वैभववाडी येथे भव्य समारंभामध्ये आज महाराणा प्रतापसिंह कलादालन व सांस्कृतिक केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मेवाडचे युवराज लक्षराज कुंवर, कोल्हापूरचे युवराज खासदार संभाजी छत्रपती, खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, रावराणे मंडळाचे अध्यक्ष गणपत रावराणे, उपाध्यक्ष सदानंद रावराणे, वैभववाडीच्या नगराध्यक्ष गजयेबार, तहसीलदार संतोष जाधव आदी उपस्थित होते.

देशाच्या इतिहासामध्ये अनेक शूर व्यक्तीमत्व होऊन गेली, पण त्यातील लक्षात राहण्यासारखे कार्य केले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांनी असे सांगून पर्यटन मंत्री श्री. रावल म्हणाले की, भविष्यात यशस्वी होण्यासाठी इतिहासाची आठवण असणे गरजेचे आहे. या दालनाच्या निमित्ताने महाराष्ट्र व राजस्थानच्या इतिहासावर प्रकाश टाकण्याचे कार्य केले आहे. मराठा व राजपूत यांची सांगड घालण्याचे कार्य या कलादालनाने केले आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही हे कलादालन महत्वाचे आहे. पर्यटनास इतिहासाची जोड दिल्यास त्याचा फायदा पर्यटकांना होतो. आपल्या पुढील पिढीला आपला इतिहास माहिती व्हावा या उद्देशाने उभारण्यात आलेल्या हे स्मारकाचा लाभ पर्टयकांनी घ्यावा. तसेच या निमित्ताने मेवाड व कोल्हापूरच्या युवराजांना एकत्र आणण्याचा एक नवा इतिहास रचला गेला आहे.

आमदार श्री.राणे यांनी या स्मारकाच्या उभारणीचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, पर्यटनाच्या माध्यमातून इतिहासाचे जतन करणे व आपला इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या स्मारकाचा उद्देश आहे.

संभाजी छत्रपती म्हणाले की, या स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने मेवाडच्या घराण्याशी संबंधीत सर्व वंशजांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. हा इतिहासातील एक सुवर्ण क्षण आहे.

आपण समाज, देश व धर्मासाठी काय करु शकतो याचा प्रत्येकाने विचार करण्याचा आजचा काळ असल्याचे प्रतिपादन करुन नारायण राणे म्हणाले की, आजचा काळ तलवारीने लढण्याचा नसून बुद्धीमत्ता व तंत्रज्ञानाच्या बळावर देशाचा विकास साधण्याचा आहे. देशाच्या विकासामध्ये आपण दिलेलं योगदान हे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या कार्याचाच एक भाग असेल. आजचे युग बुद्धीमतेने लढण्याचे आहे. आपण सर्वांनी या बुद्धीचा वापर करुन देशाला महासत्ता बनवण्यासाठी लढुया असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दोन महिन्यात विमानतळ सुरू करणार

यावेळी बोलताना श्री. राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळ लवकरात लवकर पूर्ण करावे अशी विनंती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना केली. तसेच देशातील पहिले सी वर्ल्ड सिंधुदुर्गात सुरू करावे असेही ते म्हणाले. श्री. रावल यांनी विमानतळ व दोन पंचतारांकीत हॉटेल्स लवकरच सुरू करण्यात येतील, असे सांगितले. तसेच सी वर्ल्डबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक संतोष सावंत यांनी केले तर रावराणे मंडळातर्फे मान्यवरांचे स्वागत व नगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *