बनावट डॉक्टरांवर आळा आणण्यासाठी महाराष्ट्र मेडिकलं कौन्सिलचा ‘नो युवर डॉक्टर’ हा प्लॅटफॉर्म सुरू!
रुग्णांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल; क्यूआर कोडवरुन कळणार डॉक्टरांची संपूर्ण माहिती – KNOW YOUR DOCTOR PLATFORM
छत्रपती संभाजीनगर:- बनावट डॉक्टरांवर आळा आणण्यासाठी महाराष्ट्र मेडिकलं कौन्सिलनं ‘नो युवर डॉक्टर’ हा प्लॅटफॉर्म सुरू केला असून रुग्णांच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. आता क्यूआर कोडवरुन डॉक्टरांची संपूर्ण माहिती कळणार आहे.
राज्यात अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालेला पाहायला मिळतो, विशेषतः ग्रामीण भागात अशा डॉक्टरांचं प्रमाण अधिक असल्याची प्रकरणं नेहमीच उघडकीस येत असतात. त्यामुळे डॉक्टर बदनाम होतात. त्याच्यावर उपाययोजना म्हणून आता प्रत्येक डॉक्टरांना ‘क्युआर कोड’ मिळणार असून “महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलतर्फे सर्व अधिकृत वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना आपली माहिती ऑनलाईन पद्धतीनं भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक दवाखान्यात आता हा क्युआर कोड लावण्यात येईल, तो स्कॅन केल्यावर संबंधित डॉक्टरांची अधिकृत माहिती रुग्णांना कळणार आहे,” अशी माहिती आयएमए अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनं ११ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘नो युवर डॉक्टर’ ही योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश रुग्णांना त्यांच्या डॉक्टरांची खरी ओळख पटवून देणे आणि आरोग्यसेवेत पारदर्शकता आणणे; हा आहे. या योजनेअंतर्गत सर्व नोंदणीकृत डॉक्टरांना त्यांच्या क्लिनिकमध्ये क्युआर (QR) कोड असलेली केवायडी KYD कार्ड लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक हा क्युआर (QR) कोड स्कॅन करून संबंधित डॉक्टरची नोंदणी, शैक्षणिक पात्रता आणि विशेषज्ञता याबाबतची माहिती मिळवू शकतात.
डॉक्टरांविषयी रुग्णांना खरी माहिती मिळणं गरजेचं झालंय. त्यामुळं ऑनलाइन पद्धतीनं एका क्लिकवर ती उपलब्ध असणार आहे. रुग्ण ‘के.वाय.डी पोर्टल’वर जाऊन डॉक्टरचे नाव टाकूनही त्यांची माहिती मिळवू शकतात. या पोर्टलवर डॉक्टरचा नोंदणी क्रमांक, पदवी, नोंदणीची वैधता आणि विशेषज्ञता याबाबतची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळं शासनानं सर्व नोंदणीकृत डॉक्टरांनी www.kyd.co.in या संकेतस्थळावर जाऊन आपला क्युआर (QR) कोड तयार करून तो आपल्या क्लिनिकमध्ये लावावा असे निर्देश दिले आहेत.