महापौर राहुल जाधव व जलतरणपटू कांचनमाला पांडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट
नवी दिल्ली:- पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव आणि नागपूर येथील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली.
दिव्यांग पूरक संकेतस्थळाची निर्मिती करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आज केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडु यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट संकेतस्थळाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापौर राहुल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तर नागपूर येथील कांचनमाला पांडे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला दिव्यांग खेळाडूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या दोघांच्या उपलब्धीसाठी महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.