पोहरादेवी विकासासाठी १०० कोटी ; बंजारा अकादमी स्थापणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पोहरादेवी रस्ते व रेल्वे मार्गाने जोडणार- कलाकुसरीच्या वस्तूसाठी बंजारा क्लस्टर
वाशिम:- देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आणखी १०० कोटी रुपयांच्या निधी देण्यात येईल. तसेच बंजारा समाजाची संस्कृती जपण्यासाठी बंजारा अकादमी उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी येथे केली.
काल पोहरादेवी विकास आराखड्यातील नंगारारुपी वास्तूसंग्रहालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संत रामराव महाराज, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संजय राठोड, सहपालकमंत्री मदन येरावार, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार सर्वश्री संजय धोत्रे, भावना गवळी, प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री हरिभाऊ राठोड, गोपकिशन बाजोरिया, श्रीकांत देशपांडे, मनोहर नाईक, प्रदीप नाईक, अॅड. नीलय नाईक, राजेंद्र पाटणी, लखन मालिक, डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, कर्नाटकचे आमदार प्रभू चव्हाण, रेवू नाईक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष उर्मिला राठोड, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सेवालाल महाराज यांनी समाजाला दिशा देण्यासोबतच लढवय्येपणाची शिकवण दिली. संपूर्ण बंजारा समाजाला परिवार मानून त्यांनी अन्याय करणाऱ्या परकियांविरुद्ध संघर्ष केला. ब्रिटीशांविरूद्ध पहिला एल्गार त्यांनी पुकारला. अशा महान व्यक्तीच्या समाधीस्थळाचा विकास करणे ही राज्य शासनाची अग्रकमाची जबाबदारी आहे. सेवालाल महाराजांची जयंती आता शासनस्तरावर साजरी करण्यात येत आहे. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव होण्यासाठी हे जागतिक दर्जाचे स्मारक असेल. या स्मारकासाठी २५ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उर्वरित १०० कोटी रुपयांचा निधीसुद्धा लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच पोहरादेवीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
बंजारा समाजाची संस्कृती जपण्यासाठी बंजारा अकादमी स्थापन करण्यात येईल. जिल्ह्यातील विविध महामार्गांसोबतच पोहरादेवी येथून समृद्धी महामार्ग जाणार आहे. त्यासोबतच वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गावर पोहरादेवी येथे स्थानक देण्यात येणार आहे. रेल्वे आणि रस्ते मार्गाने पोहरादेवी जोडल्या जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांसह भाविकांना येथे येण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
बंजारा समाजाच्या आश्रमशाळांना संहिता तयार करून देण्यात आली आहे. त्यासोबतच परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येतील. तांडा वस्ती सुधारण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात येईल. त्यामुळे बंजारा समाजाचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. बंजारा समाजाच्या मागणीप्रमाणे इदाते आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. बंजारा समाजाच्या कलाकुसरीच्या दागिन्यांनी परदेशी पर्यटकांना देखील भुरळ घातली आहे. बंजारा कलेला वाव देण्यासाठी याठिकाणी बंजारा क्लस्टर तयार करण्यात येईल. या माध्यमातून उत्पादीत वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सेवालाल महाराजांनी पाणी काटकसरीने वापरण्याचा संस्कार केला होता. पाण्याबाबतीतील त्यांची भूमिका सरकार जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पुढे नेत असल्याचे सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी समाजाच्या मागण्यांबाबत आपण सहमत असल्याचे सांगितले. संत सेवालाल महाराजांनी चांगल्या वैचारिक शिकवणीसह लढाऊ वृत्तीचे दर्शन घडविले. त्यांनी समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. शासनाने प्रत्येक समाजाला आधार देण्याची गरज आहे. आधारामुळे समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन ते प्रगती करू शकतील. पोहरादेवी येथील स्मारकामध्ये जगातून पर्यटक यावेत. संत सेवालाल महाराजांची शिकवण जगभर पोहचावी, यासाठी हे स्मारक उभे राहणे गरजेचे असल्याचे सांगितले.
श्री. मुनगंटीवार म्हणाले, संत सेवालाल महाराजांनी वास्तववादी विचार समाजापर्यंत पोहोचविले. त्यांच्या शिकवणुकीमुळे भयमुक्त राज्य होण्याची संकल्पना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचली. महाराजांचे विषमतामुक्तीचे विचार राज्यात पेरले जाणे आवश्यक आहे. पराक्रमी असलेल्या बंजारा समाजाची भावना ओळखून याठिकाणी होत असलेले स्मारक कृती करण्यासाठी प्रवृत्त करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्रीमती मुंडे म्हणाल्या, तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरागडचा विकास होणे आवश्यक आहे. या स्मारकाचे बांधकाम तातडीने पूर्ण करून लोकार्पणही तातडीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. बंजारा समाजाच्या महिला अत्यंत सुंदर कलाकुसरीच्या वस्तू तयार करतात. या वस्तूंना अमेरिकेसारख्या देशात चांगली मागणी आहे. नुकत्याच झालेल्या महिलांच्या अमेरिका दौऱ्यात महिलांनी कलाकुसरीच्या वस्तू चांगल्या किंमतीत विकल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री श्री. राठोड यांनी प्रास्ताविकातून पोहरादेवीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, बंजारा समाजासाठी नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करावी, यासोबतच एकच बोलीभाषा, संस्कृती असणारा बंजारा समाज विविध राज्यात वेगवेगळ्या संवर्गात मोडतो. त्यामुळे हा समाज एकाच अनुसूचित जमाती या संवर्गात समावेश करावा, त्यासोबतच वसंतराव नाईक महामंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद करून अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नेमण्याची प्रक्रिया तातडीने करावी, यासह अनेक मागण्या यावेळी त्यांनी केल्या.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नंगारा वास्तूचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी ‘घुमायो नंगारा’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि श्री. ठाकरे यांच्या हस्ते संत रामराव महाराजांचा सत्कार करण्यात आला. रामराव महाराजांच्या हस्ते मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि श्री. ठाकरे यांना हातातील कडे भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाला देशभरातील बंजारा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक बंजारा समाजातील महिला पारंपरिक पेहरावात उपस्थित होत्या. प्रा. संजय चव्हाण, सोमेश्वर पुसदकर, रवींद्र पवार आणि प्रा. राजेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. टी. सी. राठोड यांनी आभार मानले.