म्हाडाचे उपनिबंधक बी. एस. कटरे यांना शिक्षिका पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक!

८ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या व २० लाख रुपये घेऊनही हुंड्यासाठी छळ! भाऊ सचिन सेजल यांची तक्रार!

उपनिबंधक बी. एस. कटरे यांना बडतर्फ करून त्यांच्या कार्यालयीन कामकाजाची सखोल चौकशी आवश्यक!

मुंबई (प्रतिनिधी)- म्हाडामध्ये उपनिबंधक पदावर असलेल्या बी. एस. कटरे उर्फ बापू शिवाजी कटरे ह्या वरिष्ठ अधिकाऱ्याची शिक्षिका पत्नी रेणू कटरे हिने आपल्या पतीकडून हुंड्यासाठी होणाऱ्या प्रचंड मानसिक व शारीरिक त्रासामुळे कांदिवली येथील स्वतःच्या राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या महिलेनं आत्महत्या केल्यानंतर तिचा भाऊ सचिन शेजाळ यांच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पती बी. एस. कटरे आणि सासू यमाबाई कटरे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रेणू कटरे यांचे पती बी. एस. कटरे उर्फ बापू शिवाजी कटरे यांना अटक केली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

ह्याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिवारी संध्याकाळी कांदिवली पूर्वेतील लोखंडवाला येथील सिल्व्हर ओक इमारतीतील स्वतःच्या राहत्या फ्लॅटमध्ये ४२ वर्षीय विवाहित महिला रेणू बापू कटरे हिने आत्महत्या केली. कटारे यांचा भाऊ सचिन शेजाळ यांच्या तक्रारीवरून पती बापू शिवाजी कटरे व सासू यमाबाई कटरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्यानं रेणू यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. रेणू या पतीसोबत कांदिवलीत उच्चभ्रू सोसायटीत राहत होत्या.

सहकारी संस्था, मुंबई पश्चिम उपनगरे, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, म्हाडा, बांद्रा पूर्व, मुंबई ह्या ठिकाणी उपनिबंधक पदावर बी. एस. कटरे उर्फ बापू शिवाजी कटरे कार्यरत आहेत.

मृत रेणू कटरे यांच्या भावाने आरोप केला आहे की, तिचा पती आणि सासू हुंड्यासाठी तिचा छळ करत होते. `मी उच्चपदस्थ अधिकारी असून माझ्यासोबत राहण्याची तुझी लायकी नाही’ असे सांगत बी. एस. कटरे पत्नीला छळत होते. हुंडा कमी दिल्यानं सासरी रेणूला टोमणे मारले जात होते. माहेरहून पैसे आणण्यासाठीही तगादा लावला जात असे. लग्नानंतर रेणूच्या वडिलांनी ८ तोळ्यांच्या बांगड्या दिल्या होत्या. २०२३ मध्ये १२ लाख, २०२४ मध्ये १० लाख रुपये सासरच्या मंडळींना दिले होते. बापू कटरे यांच्यासह सासू-सासऱ्यांकडून रेणूचा प्रचंड मानसिक छळ केला जात होता. तिला काठीने मारहाण केली जात होते. हा वाद मिटवण्यासाठी बैठकही बोलावली होती; पण ऐनवेळी बापू कटरे याने बैठकीला येणार नसल्याचं सांगितलं. यामुळे अस्वस्थ झालेल्या रेणूने माहेरी फोन केला होता. तसंच `हा त्रास कधीच थांबणार नाही, मी त्यांना नकोय!’ असेही तिने आपल्या भावाला फोनवरून सांगितले होते.

घटनेच्या दिवशी रेणू कटारे यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना फोन करून सांगितलं होतं की, त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना त्रास देत आहेत. नंतर त्यांनी कॉल डिस्कनेक्ट केला. सुरुवातीच्या संभाषणानंतर डॉक्टरांनी त्यांचे कॉल उचलले नाहीत. मात्र लगेच डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना सूचना दिली. रेणूच्या कुटुंबातील सदस्य पुण्याहून येथे आले आणि त्यांना कळलं की तिने आपलं जीवन संपवलं आहे. रेणू यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं आणि गळफास घेतला.

सदर प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून हे सर्व दावे पडताळले जात आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने बी. एस. कटरे यांच्या कार्यालयीन कामकाजाबाबत माहिती घेतली असता समजले की, बी. एस. कटरे हे उपनिबंधक पदावर असताना `अर्थपूर्ण’ तडजोड करून अनेक चुकीचे आदेश दिले आहेत. गेल्यावर्षी एका सेवानिवृत्त शिक्षिकेने त्यांच्याकडे `हौसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी नियमांची पायमल्ली करीत चुकीच्या पद्धतीने अनेक रक्कमा वसूल केल्या’; ह्याबाबत लेखी तक्रार केली होती. परंतु बाजूने निकाल हवा असल्यास कटरे यांनी पंचवीस हजाराची मागणी कार्यालयीन कारकुनाकडून केली होती. त्यास नकार देताच सदर शिक्षिकेचा अर्ज निकाली काढण्यात आला. अन्यायग्रस्त शिक्षिकेने मांडलेली बाजू बी. एस. कटरे यांनी ऐकून घेतली नाही. अशाप्रकारे बी. एस. कटरे यांनी आपले कामकाज चुकीच्या पद्धतीने केले असून त्यांच्या संपत्तीची आणि कामकाजाची सखोल चौकशी केली जावी; अशी मागणी अनेक अन्यायग्रस्त हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांनी केली आहे.

नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एका जेष्ठ नागरिकाने सांगितले की, बी. एस. कटरे हे जर स्वतःच्या पत्नीशी पैशासाठी हैवानासारखे वागत असतील तर त्यांनी आपल्या कार्यालयीन कामकाजात नक्कीच भ्रष्टाचार केला असणार. त्यामुळे बी. एस. कटरे यांना तात्काळ बडतर्फ करून चौकशी करणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!