खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते `ज्येष्ठांचा पथदर्शक’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई (प्रतिनिधी):- शासकीय योजना, आर्थिक नियोजन तसेच वेगवेगळ्या समस्यांवर मार्गदर्शक असलेले ‘ज्येष्ठांचा पथदर्शक’ या पुस्तकाच्या मराठी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या वतीने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचा आरोग्य, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक विभाग कार्यरत आहे. त्यांच्यासाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजना, कायदे व सोयी-सवलती याविषयीची जनजागृती, वेगवेगळे उपक्रम आणि कार्यशाळांच्या माध्यमांतून केली जाते. तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आनंद मेळावे आयोजित करण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय पुरस्कारही देण्यात येतो. ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांच्यापुढील आव्हाने यावर मार्गदर्शन करण्याकरिता चव्हाण सेंटरने ‘ज्येष्ठांचा पथदर्शक’ या मराठी व ‘सिल्व्हर स्ट्रेन्थ : अ गाईड टू सिनियर इम्पॉवरमेंट’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे. त्याचे प्रकाशन चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी परांजपे स्कीम्सचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे, मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर, अभिजित मुरुगकर, डॉ. कल्याणी मांडके, डॉ. समीर दलवाई, लेखिका डॉ. अनघा तेंडुलकर-पाटील आणि अॅड. प्रमोद ढोकले, भक्ती वाळवे, हेमराज पारकर, वारस पटेल, राजश्री गावडे, ख्याती शेखर, अमेय अग्रवाल, अमिषा प्रभु विधी शहा, दत्ता बाळसराफ, विजय कान्हेकर, पुस्तकाचे प्रकाशक सतीश पवार यांच्यासह अभिजित राऊत, दीपिका शेरखाने आदी उपस्थित होते.











