मुंबई शिक्षक विकास मंडळाचा शिक्षक महायुवा संमेलन संपन्न
आ. प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती : तळेरे गावचे सुपुत्र डॉ. विशाल कडणे यांचे दरेकरांकडून कौतुक
मुंबई(निकेत पावसकर):- कालिदास नाट्यगृह मुलुंड येथे मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ आयोजित मुंबई आणि आसपासच्या विभागातील शिक्षक बांधवांसाठी भव्य युवा महासंमेलन पार पडले. या संमेलनाचे आयोजन शिक्षक मंडळाचे कार्यकारणी सदस्य आणि तळेरे गावचे सुपुत्र डॉ. विशाल कडणे यांनी केले होते. या कार्यक्रमाला आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमांमध्ये १६०० हून अधिक शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला आणि आपल्या विविध समस्या, विविध प्रश्न याबाबतची निवेदने कार्यकारणी मंडळाकडे सादर केली. सदर कार्यक्रमांमध्ये शिक्षकांच्या दैनंदिन जीवनचर्येमधील विविध प्रश्न, समायोजनाबाबतचे प्रश्न, वेतन, भत्ते, राष्ट्रीय शिक्षण धोरण इत्यादी बाबतीत सखोल चर्चा झाली. शिक्षक बांधवांसोबत आम्ही सदैव उभे आहोत आणि त्यांच्या प्रत्येक समस्येला शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचे प्रामाणिक वचन मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे कार्यकारणी सदस्य डॉ. विशाल कडणे यांनी दिले.
या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. शिक्षण हा देशाच्या व्यवस्थेचा मुख्य कणा असून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे. आपल्या संभाषनामध्ये बोलताना आ. प्रवीण दरेकर म्हणाले की, डॉ. विशाल कडणे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक चळवळीचे काम उत्तम सुरु असून शिक्षक बांधवांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ दाखवत असलेल्या तत्परतेबद्दल ते कौतुकास प्राप्त आहेत. सदर कार्यक्रमास दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक श्री. किरण शेलार यांनी महत्वाचे मार्गदर्शक केले.
सदर कार्यक्रमात विविध महत्त्वपूर्ण मागण्यांवर चर्चा झाली. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी आणि नंतर सेवेत रुजू झालेलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्ववत जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, नेमलेल्या अभ्यासगटाने केलेल्या दि. ८-५-२०२० च्या शिफारिशी मान्य करून शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १०-२०-३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करावी, शिक्षकांसाठी कॅशलेस मेडीक्लेम योजना लागू करावी, जाचक अटी रद्द करून सामान्य व तांत्रिक शाळांचे सर्व पात्र शिक्षकांना सरसकट निवडवेतनश्रेणी मान्य करावी, मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागात मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरणे, मुंबई महानगर पालिका माध्यमिक शिक्षण विभागात १ नोव्हेंबर २००५ नंतर नेमणूक झालेल्या सर्व शिक्षकांचे भविष्य निर्वाहनिधीचे खाते सुरु करून त्यांना तात्काळ डी.सी.१ लागू करावी, प्रत्येक शाळेत कला, क्रीडा व संगीत शिक्षकांची पदे पूर्वीप्रमाणे पुनर्स्थापित करावी, समुपदेशकांना शाळेत समुपदेशक पद देऊन त्यांना पूर्वीप्रमाणे वेतनवाढ मिळावी, रात्र – शाळांना पूर्ण वेळ शाळेचा दर्जा मिळावा व मुख्याध्यापकांप्रमाणे लिपिक व शिपाई पद पूर्ण वेळ करण्यात यावे, अशासकीय अनुदानित सामान्य व तांत्रिक शाळांमधील शिक्षकांचे सेवानिवृतीवेतनाचे प्रस्ताव रिकव्हरी किंवा तत्सम कारणावरून प्रलंबित न ठेवता कमाल एक महिन्याच्या आत मान्य करण्यासंबधीचे कायम स्वरूपाचे शासन आदेश निर्गमित व्हावे, वर्ग ६ ते ८ ला शिकवणाऱ्या सर्व प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी.
सदर अधिवेशनात आ. शाम सावंत, डॉ. गजानन रत्नपारखी, पराग शैक्षणिक संकुलाचे संचालक बाळकृष्ण बने शेठ, विजय कडणे, राजेश सातघरे, संजय पितळे, मनीष शाह, मंगल शाह, डॉ. शिवम सिंग पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सिद्धेश कदम यांनी केले. कार्यक्रमादरम्यान व्यक्तिमत्व विकास आणि अध्यात्मकडून शास्त्राकडे ह्या विषयावर उपस्थित शिक्षकांना स्वामीनारायण समाजाचे स्वामी भक्तीप्रिय स्वामी यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक व्यक्तिचे वय कितीही झाले तरी तो मनामधून युवाच असतो, फक्त आपल्याला त्याच्या मनातला युवक बाहेर काढता आला पाहिजे, हयाच संकल्पनेतून कार्यक्रमाचे नाव युवा संमेलन ठेवण्यात आले आहे, असे आयोजक डॉ. विशाल कडणे यांनी सांगितले. कार्यक्रमामध्ये उपस्थित शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली.
शिक्षक युवा महासंमेलन कार्यक्रम अतिशय सुरेख, अविस्मरणीय झाला. माझ्या सोबत आलेल्या शिक्षकांनाही कार्यक्रम खूप आवडला. आलेल्या सर्व मान्यवरांनी डॉ. विशाल कडणे यांचे केलेले कौतुक ऐकून सार्थ अभिमान वाटला. खरचं एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या युवा वर्गाच्या महासंमेलनाचे आपण केलेले अत्यंत उत्कृष्ठ आयोजन, नियोजन खरोखरच वाखाणण्याजोगे होते. संख्या जास्त असून ही कोठे ही गडबड नाही, गोंधळ नाही. खूपचं छान झाला कार्यक्रम. आपलं कौतुक करावे तेवढे कमीच आहे. – सुहास बांदेकर, साधना विद्यालय |
मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ तर्फे महायुवा अधिवेशन मुलुंड कालिदास येथे पार पडले. मुंबई उपनगरातील शिक्षक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. विशाल कडणे सर यांनी हा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध व सुरेख पद्धतीने पार पाडला. या कार्यक्रमास आलेल्या शिक्षकांना उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.
– भगवान सागर, बॅरिस्टर नाथ पै विद्यालय |
आ. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया- शिक्षक मंडळाच्या माध्यमातून शिक्षकांना एकत्र आणण्याचे काम संस्था करत आहे त्याबद्दल मी या संस्थांचे मनापासून अभिनंदन करतो. विशाल कडणे सामाजिक क्षेत्रात, सहकार क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात उत्तम काम करतोय. आपण समाजात काम करत असताना युवा पिढीवर चांगले संस्कार झाले पाहिजेत, आपली संस्कृती, आपली परंपरा यापासून ते दूर जाता कामा नये अशा प्रकारची काळजी घेत, युवा पिढीला सुसंस्कृत करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी निश्चित हे महासंमेलन उपयुक्त ठरेल. आपला धर्म, आपल्या परंपरा, आपल्या चालीरीती त्यांना माहित व्हाव्यात, इथल्या मातीशी नाळ त्यांची जोडली जावी यासाठी विशाल कडणे आणि त्यांचे सर्व सहकारी मेहनत घेतायेत त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. या युवा संमेलनाच्या माध्यमातून युवांना चांगलं मार्गदर्शन होईल, त्यांच्यावर चांगले संस्कार होतील अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. मी आयोजक समितीचे आणि डॉ. विशाल कडणेचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. |