मराठी भाषेचा वापर वाढण्याची गरज – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई:- बदलत्या काळानुसार मराठी भाषेचा नियमित व अधिक वापर होण्याची गरज आहे. यासाठी मराठी पालकांनी आपल्या पाल्यांना किमान दहा वर्षे मराठी भाषेतून शिक्षण द्यावे, तरच मराठी मुले लेखन, वाचन आकलनात तरबेज होतील, असे मत उद्योगमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.
गोरेगाव परिसरातील महाराष्ट्र विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख तसेच अभिनेत्री आणि मराठी शाळांच्या सदिच्छादूत व अभिनेत्री चिन्मयी सुमीत उपस्थित होत्या.
श्री. देसाई म्हणाले, सध्या इंग्रजी भाषेचा वापर वाढत आहे. मातृभाषेतून शिक्षण मिळावे, यासाठी संघर्ष करावा लागणे दुर्दैवाचे आहे. यासाठी मराठी भाषेविषयी असलेले गैरसमज सर्वप्रथम दूर करणे गरजेचे आहे. मराठी अधिक सक्षम झाली पाहिजे.
अनेक वरिष्ठ अधिकारी मराठी भाषेतून शिकून प्रशासकीय अधिकारी झाले आहेत. यावरून मुलांनी मराठीत शिक्षण घेतल्यास त्यांना कुठेही अडचण येत नाही हे लक्षात येते. मराठी सक्तीची करावी, या मागणीला आपला पाठिंबा राहिल असेही श्री. देसाई यांनी सांगितले. या संदर्भात कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. मात्र इंग्रजी शाळांचा दुस्वास करून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी एकूण रचनेत सुधारणा करणे आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमातून बाहेर पडलेली मुले वाचन, लेखन आकलनात तरबेज असतात. त्याचप्रमाणे मराठी माध्यमातून शिकलेली मुले तरबेज असावीत, यासाठी प्रयत्न करण्याची गरज श्री. देसाई यांनी बोलून दाखवली.
संमेलनाचे उद्घाटक लक्ष्मीकांत देशमुख यांनी मराठी भाषा व शाळा सक्षम करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा असे सांगितले. सध्या महानगरांमधील शाळांमध्ये इंग्रजीचा प्रभाव वाढत आहे. मराठीची भाषिक फाळणी सुरू आहे. ग्रामीण आणि शहरी भाषिक अशी दरी निर्माण झाली असून ती घातक आहे. मराठी टिकण्यासाठी इंग्रजी शाळांचे मराठीकरण तर मराठी शाळांचे सक्षमीकरण करण्याची गरज आहे. विविध राज्यांनी आपली मातृभाषा टिकवण्यासाठी कायदे केले आहेत. महाराष्ट्रानेदेखील असा कायदा करून मराठी वाचवण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली. मराठी शाळा सक्षमीकरण करण्यासाठी विशेष भर देण्याची गरज आहे. उत्तम मराठी शिकवले गेले पाहिजे, बागा, मैदाने, प्रयोगशाळा उभ्या राहण्याची गरज आहे. यासाठी शासनाने अर्थसंकल्पात १० ते १५ टक्के वाढीव निधी मंजूर करावा. मुंबई व परिसरातील शाळांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मराठीची आवड वाढवण्यासाठी मुले, पालक यांच्यासह नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पुस्तक विक्री केंद्र सुरू करण्याची सूचना देशमुख यांनी केली. यावेळी दीपक पवार, विद्या शेवडे, विलास धस आदी उपस्थित होते.