आता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव- केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर

महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद: खेलो इंडियाचा शानदार समारोप

पुणे:- खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील क्रीडा क्षेत्रातील हिरे आपल्याला गवसले आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला अग्रेसर बनविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळाला स्थान देणे आवश्यक आहे. सशक्त भारताच्या निर्माणासाठी आता यापुढे प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.

महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडियाच्या पुरस्कार वितरणप्रसंगी श्री. जावडेकर बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री विनोद तावडे, केंद्रीय क्रीडा सचिव राहुल भटनागर, स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साई) महासंचालक नीलम कपूर, अतिरिक्त मुख्य सचिव (क्रीडा) वंदना कृष्णा, स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साई) उपमहासंचालक संदीप प्रधान, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, ऑलिम्पिक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी तथा सह सचिव ओंकार सिंग, स्टार स्पोर्टचे चैतन्य दिवाण आदी उपस्थित होते.

श्री.जावडेकर म्हणाले, देशातील क्रीडा क्षेत्रातील युवकांना संधी मिळावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया उपक्रम सुरू केला. या निमित्ताने देशभरातील क्रीडा क्षेत्रातील प्रतिभाशाली खेळाडू आपल्याला मिळाले आहेत. खेळाच्या माध्यमातूनच सशक्त भारत निर्माण होणार आहे, मैदानावर घडणारा हाच उद्याचा नवा भारत आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळ सुध्दा महत्वाचा भाग आहे. क्रीडांगणावर खेळताना निघणारा घाम हेच खेळाडूंचे खरे बक्षीस असल्याचे त्यांनी सांगितले.

जगात हिंदुस्थान अव्वल व्हावा – विनोद तावडे

श्री. तावडे म्हणाले, खेलो इंडियाच्या आयोजनाची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल आम्ही केंद्र सरकारचे आभारी आहोत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात राज्याच्या क्रीडा विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आहेत. ही स्पर्धा यशस्वी करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ पहिला आला याचा मनस्वी आनंदच आहे, मात्र जगात क्रीडा क्षेत्रात हिंदुस्थान अव्वल व्हावा हीच अपेक्षा आहे. खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील प्रतिभाशाली खेळाडू पुढे आले असून तेच आपल्या देशाचा झेंडा जगात उंचावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खेलो इंडिया युथ गेम्सचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल ‘साई’च्या महासंचालक नीलम कपूर यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.

खेलो इंडियाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र क्रीडा पथकाचे प्रमुख विजय संतान यांच्यासह खेळाडूंनी स्वीकारला. व्दितीय क्रमांकाचा चषक हरियाणा संघाला तर तृतीय क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीच्या संघाच्या पथक प्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते चषक देवून सन्मानित करण्यात आले.

घुमला शिवछत्रपतींचा जयघोष…

सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक महाराष्ट्राच्या संघाला मिळाल्यामुळे कार्यक्रमस्थळी मोठा जल्लोष सुरू होता. मान्यवरांच्या हस्ते चषक स्वीकारल्यानंतर पथक प्रमुखांनी महाराष्ट्राचे सर्व विजेते खेळाडू असलेल्या मंचावर चषक नेला. त्या ठिकाणी विजेतेपदाचा चषक नेल्यानंतर विजेत्या खेळाडूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला, त्याला समारंभासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांनी जोरदार साथ दिली, त्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ शिवछत्रपतींचा जयघोष दुमदुमत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *