महाराष्ट्रात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण, ८४ टक्के उद्दिष्ट साध्य- आरोग्यमंत्री

गोवरमुळे भारतात दरवर्षी सुमारे ५० हजार रुग्ण दगावतात

मुंबई:- गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेत राज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण झाले असून ८४ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. नाशिक, उस्मानाबाद, पुणे आणि लातूर या चार जिल्ह्यांत ग्रामीण भागातील लसीकरण १०० टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

कोल्हापूर, भंडारा, धुळे, नाशिक, सातारा, वर्धा, अहमदनगर, हिंगोली, गडचिरोली, नागपूर, औरंगाबाद, नांदेड , जळगाव, परभणी व ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील ९० टक्क्यांहून अधिक बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

गोवरमुळे भारतात दरवर्षी सुमारे ५० हजार रुग्ण दगावतात. रुबेला हा पूर्णपणे संसर्गजन्य आहे. अशा गंभीर आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्यात ९ महिने ते १५ वर्षाखालील सर्व बालकांसाठी २७ नोव्हेंबर पासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. आता ज्या बालकांचे लसीकरण झाले नाही अशांसाठी शाळांमध्ये दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांवर मोफत लसीकरण करण्यात येत आहे.

शाळाबाह्य बालकांचे लसीकरण करण्यासाठी एक विशेष फिरते पथक कार्यरत आहे. या लसीकरणाबाबत शंकांचे योग्य निरसन झाल्यामुळे पालक, शाळादेखील लसीकरणासाठी पुढाकार घेताना दिसत आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

या लसीकरण मोहिमेबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. त्यामुळे काही शाळांमधून सकारात्मक परिणाम दिसत आहे. लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच महापालिका क्षेत्रांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत असल्याचे आरोग्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *