रेडी रेकनरच्या दारात वाढ न करण्याचा राज्य सरकारचा सकारात्मक निर्णय

मुंबई :- आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी अखेर मालमत्ता बाजाराला मोठा दिलासा देत राज्य सरकारने रेडी रेकनर दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपसचिव डॉ. सत्यनारायण बजाज यांच्या स्वाक्षरीचा आदेश आज दुपारी जारी करण्याचे आल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र मुद्रांक नियम 1995 – नियम 4 – उपनियम 9 मधील तरतुदीनुसार वार्षिक दर विवरणपत्रात कोणताही बदल न करता पुढील आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये रेडी रेकनर दर तसेच राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले. ह्या घोषणेचा मालमत्ता बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून येईल असे आर्थिक तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

रेडी रेकनर दर म्हणजे काय ?

जमिन किंवा इमारत खरेदीविक्रीचा व्यवहार करताना नोंदणी करण्यासाठी राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्क आकारले जाते. ह्या व्यवहारात रेडी रेकनरचे दर महत्वाचे असतात. दरवर्षी हे दर बदलले जातात. रेडी रेकनरमध्ये बांधकामाचा प्रकार, स्थळ यावरून मालमत्तेचे दर कमी-अधिक ठरवले जातात. त्यासाठी जमीन आणि इमारतीचे विभागनिहाय वार्षिक बाजारमूल्य ठरवले जाते. त्यालाच रेडी रेकनर म्हटलं जात! रेडी रेकनरचे दरात वाढ न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊ शकते; असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वार्षिक बाजार मूल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर व जंगम मालमत्तेचे सरासरी दर निश्चित करण्यात येतात.

यावर्षी क्रेडाई, विकासक व इतर सामान्य नागरिकांकडून जमीन व इमारत या मिळकतींच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात येऊ नये अशी विनंती राज्य शासनास करण्यात येत होती. या निवेदनांचा सकारात्मक विचार करुन रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.

येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच सन २०२३-२४ च्या वार्षिक दर विवरणपत्र दरात कोणताही बदल न करता ते मागील वर्षाप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत. रेडी रेकनरचे दर स्थिर ठेवल्यामुळे मालमत्ता खरेदी व विक्री करणाऱ्या दोघांनाही फायदा होतो. सामान्य नागरिकांना घर खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळते. तसेच बांधकाम व्यावसायिक, घरकुल विकासक, रिअल इस्टेटमध्ये काम करणारे मध्यस्थ, वकिल व सल्लागार आणि स्थावर मालमत्ता धारकांच्या व्यवसायात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन खरेदी-विक्रीस चालना मिळते. त्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या बाबी विचारात घेऊन शासनाने सन 2023-24 च्या रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्याचे श्री. विखे- पाटील यांनी सांगितले.

You cannot copy content of this page