सर्वसामान्य माणसाचे `अस्तित्व’ निर्माण करण्यासाठी उपयुक्त असणारे आप्पासाहेब पटवर्धन यांच्या विचारांचा प्रसार आवश्यक!
आप्पासाहेब पटवर्धन यांच्या ४८ व्या स्मृतिदिन कार्यक्रमात रवींद्रनाथ मुसळे गुरुजी यांचे प्रतिपादन
कणकवली:- “आप्पासाहेब पटवर्धन यांचे जीवन प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार तळागाळातल्या माणसाला त्याचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरणारे असून समाज माणूस म्हणून घडण्यासाठी आवश्यक आहेत. हे विचार टिकवून ठेवून गोपुरी आश्रमाची वाटचाल सुरु आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार तळागाळात व्हायला हवा. त्यासाठी येत्या वर्षभरात त्यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने प्रयत्न करण्यात येणार आहेत!” असे प्रतिपादन रवींद्रनाथ मुसळे गुरुजी यांनी गोपुरी आश्रमात आयोजित आप्पासाहेब पटवर्धन यांच्या ४८ व्या स्मृतिदिन कार्यक्रमात केले.
यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष हेमंत सावंत, ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी, डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्ट मुंबईच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या पदमावती गुप्ते, स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघटनेचे सचिव डी. आर. परब, पंकज दळी, संदीप राणे, गोपुरी आश्रमाचे सचिव मंगेश नेवगे, संचालिका अर्पिता मुंबरकर, साधना वैराळे, हरिहर वाटवे, कणकवलीतील ज्येष्ठ नंदू आरोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुसळे गुरुजी पुढे म्हणाले की, श्रमदानातून गोपुरीसारखे वैभव निर्माण केले. सत्य घटनांचा मागोवा घेत विशेषत्वाने गोपुरी आश्रम उभा केला. त्याची महती तळागळात पोहोचवली. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी यांनी अप्पांच्या विचारांना शिडीची उपमा दिली. त्यांनी शिडीच्या वरच्या माणसाचा विचार न करता शिडीच्या तळातील माणूस वर कसा येईल? याचा प्रयत्न केला.
यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी आप्पांच्या तत्वांना अनुसरुनच गोपुरी आश्रमाचे काम पुढे जाईल असे सांगितले.
कणकवलीतील उड्डाणपुलाला आप्पासाहेब पटवर्धन यांचे नाव देण्याची मागणी कणकवलीत होत असल्या उड्डाणपुलाला आप्पासाहेब पटवर्धन यांचे नाव द्यावे; अशी मागणी उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमस्थळी केली. यासंदर्भात शासकीय पातळीवर पाठपुरावा करावा, अशी सूचना सुद्धा उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमस्थळी करुन आप्पासाहेब पटवर्धन यांच्या नावाचा आग्रह धरावा आणि त्यांचे नाव उड्डाणपुलाला देऊन त्यांनी कणकवलीत केलेल्या सामाजिक कार्याची आठवण भविष्यातील पिढीसमोर ठेवण्यासाठी शासनाने सहकार्य करावे; अशी सूचना उपस्थित मान्यवरांनी केली.
मुंबई गोवा महामार्गालगतच्या तोड झालेल्या झाडांच्या पुनर्रलागवडीविषयी चर्चासत्र
आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुण्यतिथीनिमित्त कणकवली तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या २१ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विविध प्रकारच्या जंगली आणि फळांच्या मिळून ३० हजार ८२० झाडांची तोड झाली आहे. यासंदर्भात डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्ट आणि स्नेहसिंधु कृषि पदवीधर संघटना यांच्या सहकार्याने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यापुढे रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे अशक्य आहे. कारण सदर जागा खासगी मालकीच्या आहेत. शिवाय झाडे लावण्यासाठी जागा शिल्लक नाही. तोडलेल्या झाडांची पुन्हा लागवड करायची असेल तर जी पडीक जमीन आहे, त्या जमिनीचा विचार करावा लागेल. त्यासाठी सर्व संबंधितांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. यावेळी झालेल्या चर्चेत प्रत्येक वन्यप्रेमी व्यक्तींनी आपल्या घरी स्थानिक प्रजातींची किमान पाच झाडे पिशवीत तयार करावीत व जून महिन्यात त्याची लागवड करावी. शिवाय प्रत्येक वन्यप्रेमी व्यक्तीने आपल्या सोबत किमान दहा माणसे या प्रयोगासाठी तयार करावीत. असे केल्यास भविष्यात आपण या वृक्षतोडीला पर्याय म्हणून वनलागवडीचा प्रयोग यशस्वी करु शकू; असा संकल्प स्नेह सिंध कृषी पदवीधर संघटनेचे संदीप राणे यांनी व्यक्त केला. सर्व उपस्थितांनी या सूचनेला एकमताने दाद दिली.
`आपण दहा लाख झाडे लावण्याचा संकल्प करूया,’ हे करताना जैवविविधतेला धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घेण्याचा प्रयत्न करूया! असेही संदीप राणे म्हणाले. संदीप राणे यांनी अशी सूचना केली की चौपदरी रस्त्याच्यामध्ये जी झाडे लावली जाणार आहेत तो फिस्टेल पामची झाडे (भेलडा माड) लावावीत. ही झाडे रस्त्याच्या मध्ये लावावीत. असे झाल्यास मुंबई गोवा कोकण रोड ‘फिस्टेल पाम रोड’ म्हणून जागतिक पातळीवर ओळखला जाईल. या सूचनेचा सर्व पातळीवर विचार व्हावा; असेही संदीप राणे म्हणाले.
स्नेहाहिंदू कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष हेमंत सावंत यांनी ‘सेल्फी विथ प्लांटेशन’ची कल्पना मांडली. अलीकडे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरे करतात. आपल्या वाढदिवसाला त्याने एक झाड लावावे व त्यासोबत सेल्फी घ्यावी. यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड होऊ शकेल. याचा विचार प्रत्येकाने करावा.
यावेळी डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्टच्या प्रतिनिधी पदमावती गुप्ते यांनी आपण सामाजिक पातळीवर हा विचार पोचवण्याचा प्रयत्न करूया; असे आवाहन केले.
हरिहर वाटवे यांनी एकंदर वृक्षतोडीच्या परिस्थितीची माहिती उपस्थितांना दिली. याबाबत अभ्यास करून नियोजन व्हावं अशी सूचनाही त्यांनी केली.
साधना वैराळे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. फिस्टेल पामची शंभर झाड़े कणकवली ज्येष्ठ नागरिक संघाने उपलब्ध करुन द्यावीत, अशी सूचना करण्यात आली. कणकवली तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रवींद्रनाथ मुसळे गुरुजी यांनी ही जबाबदारी पूर्ण करू असे सांगितले. नागरिकांनी या वन लागवडीच्या चळवळीत सहभागी होऊन आपल्या कुवतीप्रमाणे जेवढी झाडे तुटली आहेत तेवढी झाड़े भविष्यात लावण्याचा प्रयत्न करूया; असा विचार उपस्थितांनी मांडला. यावेळी चर्चेत कणकवलीचे ज्येष्ठ नंदू आरोलकर यांनीही सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपुरी आश्रमाचे सचिव मंगेश नेवगे यांनी सूत्रसंचालन अमोल भोगले, तर आभार सदाशिद राणे यांनी मानले. या कार्यक्रमाला विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.