राणेंच्या घराणेशाहीला राजन तेली, गौरीशंकर खोत, सतीश सावंत हेच जबाबदार! -नागेश मोर्ये
पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम-वित्त सभापती नागेश मोरये यांनी सुनावले खडे बोल
सिंधुदुर्ग:- “सावंतवाडीत नुकतीच माजी नारायण राणे समर्थक गौरीशंकर खोत, परशुराम उपरकर, राजन तेली, सतीश सावंत या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुढारी मंडळींची पत्रकार परिषद झाली. त्या परिषदेत माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणेंचा लेखाजोखा एकत्रितपणे मांडणार अशी जाहिरात या मंडळींनी केली, पण प्रत्यक्ष पत्रकार परिषदेत `केसरकर एके केसरकर’ असेच झाले, राणेंबाबत हातचे राखूनच ही मंडळी बोलली! या पत्रकार परिषदेत `नारायण राणेंच्या घराणेशाहीला विरोध करण्यात नागेश मोरयेही होते’ याची आठवण संबंधितांनी काढली, याबद्दल मी त्यांचा जरुर आभारी आहे, पण खरा मूळ मुद्दा बाजुला राहतोच. नारायण राणेंच्या घराणेशाहीला राणे यांचे एके काळचे डावे-उजवे असणारे राजन तेली, गौरीशंकर खोत, सतीश सावंत हेच जबाबदार होते. राणे यांची एकाधिकारशाही वाढण्यासाठी परशुराम उपरकर हेही तेवढेच जबाबदार होते, हे वास्तव आहे,” असे खडे बोल मूळ शिवसेनेचे तत्कालीन बांधकाम सभापती, नांदगाव पंचक्रोशीतील विद्यमान नेते, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष नागेश मोरये यांनी सुनावले आहेत.
“नारायण राणे यांनी वर्षानुवर्षे राबलेल्या- खस्ता खाल्लेल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना डावलून आपल्या दोन्ही मुलांची सोय लावायला सुरुवात केली, त्यावेळी सर्वात प्रथम विरोध दर्शविणारा मीच होतो हे सत्य आहे; परंतु तेव्हा तुम्हीच एकमेकांना शह-काटशह देण्यासाठी राणे यांची मर्जी सांभळण्यासाठी, त्यांचीच तळी उचलीत होता. मी नारायण राणे यांच्या घराणेशाहीला विरोध करतो, म्हणून माझ्यासारख्या अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांना, तुम्ही लोकांनी डावलायला सुरुवात केली, हे खरं नाही काय?” असा सवालही नागेश मोरये यांनी केला आहे.
“संदेश पारकर यापूर्वी एकदा नारायण राणे यांच्या विरोधात उभे राहिले होते, त्यानंतरच्या निवडणूक निकालानंतरच्या `मालवण येथील सभेत प्रत्येक पदाधिकाऱ्यास मी पैसे दिले आहेत’ असे नारायण राणे म्हणाले होते, त्यावेळी मी एकटाच उठून `मी एक पैसा तुमचा घेतलेला नाही ‘ असे सांगण्याचे धारिष्ट्य दाखविले. तेव्हापासून मी नारायण राण्यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये गेलो. तेव्हा तुम्ही सारेजण त्यात परशुराम उपरकर ही गप्प होते. राणे यांच्या घराणेशाहीबद्दल मी विरोध सुरू केल्यावरही तुम्ही सर्व गप्प होता, मग तुमच्या आजच्या या बोलण्याला काय अर्थ आहे?” असा सवाल नागेश मोरये यांनी केला आहे.
“सिंधुदुर्ग जिल्ह्याला जे काही विकासाच्यादृष्टीने मिळालेले आहे ते वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच मिळालेले आहे असं मी आज काँग्रेसमध्ये असूनही प्रांजळपणे कबूल करतो. राणे अथवा त्यांचे एकेकाळचे डावे-उजवे एकमेकांना `जे दिले घेतल्याचे’ म्हणत आहेत, तो तुमचा आपसातला व्यवहार आहे. ते काही जनतेवरचे उपकार नाहीत. राणेंनी कुणाला काही दिले असेल, तर त्या बदल्यात त्यांनी एवढी सत्ता पद संपत्ती मिळविली आहे आणि त्यांच्या डाव्या-उजव्यांनी राणेंसाठी काही केले असेल तर त्याचाही पुरेपूर मोबदला त्यांनी मिळविलेला आहे. तेव्हा बोलायचेच असेल तर लोकांच्या प्रश्नावर बोला. निवडणुकीतल्या मूळ मुद्द्यावर बोला!” असेही नागेश मोरये यांनी म्हटले आहे .
“मी काँग्रेस पक्षाचाच निष्ठावान कार्यकर्ता आहे. महाविकास आघाडीचे काम परमकर्तव्य म्हणून मी निष्ठेने पार पाडणार आहे आणि पाडीत आहे. मी मूळ काँग्रेसचाच होतो; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळे प्रभावित होऊन, शिवसेनेत अनेक वर्षे काम केलं. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर मी त्यांच्याबरोबर माझ्या मूळ काँग्रेसमध्ये परतलो, कालांतराने राणे यांनी स्वतःचा “स्वाभिमान” हा पक्ष काढला; परंतु राणेंनी माझा भ्रमनिराश केल्यामुळे मी त्या पक्षात गेलो नाही आणि अखेरपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार!” असेही नागेश मोर्ये म्हटले आहे.
“त्यावेळी नारायण राणे यांच्या घराणेशाहीला मी विरोध केला हा विरोध आजही कायम आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने कणकवली विधानसेभेची दिलेली जबाबदारी पार पाडून महाविकास आघाडीचे संदेश पारकर यांना निवडून आणण्यासाठी मी पक्षाच्या माध्यमातून शर्तीचे प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.” असं स्पष्ट करुन नागेश मोरये यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मधील शिवसेनेचा पहिला सरपंच असलदे येथे मी बसविला होता. राणे यांची मर्जी राखण्यासाठी आमच्यासारख्यांना तुमच्यापैकीच अनेकांनी सतत डावलले. आम्ही साऱ्यांचा सारा इतिहास जाणून आहोत. तेव्हा जनतेच्या प्रश्नांवर ही निवडणूक होऊ द्या. फसव्या घोषणा, फसव्या योजना आणून जनतेची कशी फसवणूक केली गेली? यावर बोला तुमची `डबलबारी’ नको!” असे आवाहन मोरये यांनी केले आहे.