गोपुरी वाचन संस्कृती उपक्रमाची पुनश्च सुरुवात
कणकवली:- गोपुरी आश्रमातर्फे गेली सहा वर्षे सातत्याने सुरू असलेल्या आणि मार्च २०२० पासून कोरोना महामारीमुळे होऊ न शकलेल्या वाचन संस्कृती विकास कार्यक्रमाचा पुनश्च शुभारंभ रविवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ रोजी झाला. महाविद्यालयीन युवक-युवतींना वाचनाची आवड लागावी यासाठी गेली सहा वर्षे सातत्याने हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमात मान्यवर लेखकांच्या व कवींच्या कादंबरी, कविता संग्रह अशा स्वरूपाच्या तसेच वैचारिक लेख यावर वाचन करून त्यावर विवेचन करणारी चळवळ, वैचारिकता विकसित करणाऱ्या युवाईला खूपच मार्गदर्शक ठरली आहे.
आ. सो. शेवरे आंबेडकरी चळवळीत समतेच्या तत्त्वाने जगलेला कार्यकर्ता! -डॉ. अनिल फराकटे
सदर कार्यक्रमात डॉ. अनिल फराकटे यांनी सुनील हेतकर यांनी संपादित केलेल्या ‘आ.सो. शेवरे व्यक्ती आणि वांड•मय’ या पुस्तकावर वाचन संस्कृतीच्या युवाईसोबत कार्यक्रमात सहभागी होऊन विवेचन केले. डॉ. फराकटे म्हणाले की, आंबेडकरी चळवळीत समतेच्या विचारांची आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात प्रत्यक्ष अंमलबजावणी करून जगलेला कार्यकर्ता म्हणजेच आ.सो. शेवरे. आंबेडकरी जाणिवा- विद्रोह- संघर्ष शिवीगाळ न करता कसा सर्वसमावेशक करता येईल? हे समाजाला दाखवून देणारा कार्यकर्ता साहित्यिक म्हणजेच आ.सो. शेवरे. हे चरित्र कार्यकर्ते, साहित्यिकांनी आवर्जून वाचायला हवे.
तसेच डॉ. फराकटे यांनी ‘वैनतेय’ साप्ताहिकाच्या वर्षारंभ विशेषांकातील लेखांच्या विषयी सुद्धा विवेचन केले. हा वर्षारंभ विशेषांक युवाईने जरूर वाचायला हवा, असे त्यांनी आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, वाचनाचा आनंद मोबाईलमध्ये फॉरवर्ड केलेल्या मेसेजपेक्षाही अधिक आनंद देणारा असतो. म्हणजेच छापलेले वाचण्यात जेवढा आनंद मिळतो तेवढा आनंद मोबाईलवरील लिखाणात मिळत नाही. याचाही बोध युवाईने घ्यायला हवा.
यावेळेस सूजय जाधव याने ज्येष्ठ पत्रकार, लेखक उत्तम कांबळे यांच्या ‘आई समजून घेताना’ या चरित्रावर विवेचन केले. उत्तम कांबळे यांना त्यांची आई अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती असतानाही उत्तम कांबळे यांना माणूस म्हणून कशी घडवते, उत्तम कांबळे यांच्यासारखा प्रतिथयश विद्वान कसा निर्माण करते? याचे विवेचन करून `आई’ हा प्रत्येक माणसाच्या जीवनातला महत्त्वाचा घटक कसा आहे? हे स्पष्ट करून आई समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
गोपुरी वाचन संस्कृती उपक्रमाच्या सल्लागार अंकिता सामंत यांनी अरुण हरकारे यांच्या ‘का?’ या पुस्तकाचे विवेचन करताना अरुण हरकारे यांनी आपल्या पुस्तकात सर्वसामान्य जनतेला ज्या आरोग्याच्या सोयी सरकार मार्फत त्वरित उपलब्ध व्हायला हव्यात; त्या त्यांना न मिळाल्यामुळे गरिबांना आणि एकंदर सर्वच समाजाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. हे लेखक आपल्या मुलाच्या मृत्यूच्या अनुभवातून शासनासमोर ‘का?’ हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करतात. त्यांच्या मुलाला गंभीर आजारपणात एका रुग्णालयातून दुसऱ्याला नेण्यासाठी वेळेत ॲंबुलन्स व्यवस्था न झाल्यामुळे त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले. यामुळे त्यांना आलेला अतिशय दुःखद अनुभव त्यांनी या पुस्तकाच्या रूपाने समाजासमोर शेअर केला आहे.
सतेज शेट्टी यांने जपानच्या एका लहान मुलीची कहाणी असलेल्या ‘तोत्तोचान’या पुस्तकाचे विवेचन करताना सांगितले की, मुलाच्या वाढीबरोबर त्याच्यातील सुप्त गुण शोधून त्याप्रमाणे त्याला विकसित होण्याची संधी द्यायला हवी. जपानमध्ये अशा स्वरूपाचा प्रयत्न पालक, शिक्षक आणि शासन पातळीवर उत्तम प्रकारे केला जातो. त्यामुळे तेथील पिढी सक्षमपणे आपली प्रगती करते. हे पुस्तक सर्वांनी वाचायला हवे; असे सतेज शेट्टी याने आवाहन केले.
शैलेश कदम यांने श्रेयस शिंदे यांनी शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी लिहिलेले ‘राजं-तुम्ही!’ या लेखाचे विवेचन करताना महाराजांची जयंती साजरी करताना आपण महाराजांचे विचार आत्मसात करतो आहोत का? असा प्रश्न लेखकाने आम जनतेला विचारला आहे. महाराजांच्या काळात स्त्रियांना मातेसमान मानले जायचे. हे विचार आज समाजात का आत्मसात होत नाहीत? असा प्रश्न लेखक संपूर्ण समाजाला करतात. दुसरा शिवाजी जन्माला यायला हवा पण त्यासाठी दुसरी जिजाऊ जन्माला यायला हवी ना! यासाठी महिलांचा सन्मान नको का व्हायला? तिला आपण माणूस म्हणून कधी स्वीकारणार आहोत? असे प्रश्न लेखकांनी उपस्थित करून शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याचे आव्हान करतात; असे शैलेश कदम यांनी सांगितले.
राकेश चौहान यांनी ‘Don’t Quit’ या इंग्रजी कवितेचे विवेचन केले. माणसाला कसे जगायला हवे? याचे विवेचन कवीने या कवितेत उत्तम पद्धतीने केले आहे. आयुष्यात माणसाच्या जीवनात येणाऱ्या संकटांना माणसाने हसतच सामोरे जायला हवे. त्या संकटांना घाबरून मानसिक तणावाखाली न जाता संकटाला सामोरे जायला हवे, असे कवीने सांगितले आहे.
या कार्यक्रमाच्या शेवटी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकिता सामंत, तर सूत्रसंचालन प्रवीण खैरावकर यांनी केले. या कार्यक्रमाला पंधरा युवक-युवती सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी सुद्धा आवर्जून उपस्थित होते. कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला.