रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या खात्यात २ हजार ८५६ कोटी रुपये जमा
मुंबई:- राज्यातील रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या बँक खात्यामध्ये सन २०२४-२५ मध्ये २ हजार ८५६. ३० कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आल्याची माहिती रोजगार हमी योजना विभागाकडून देण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत १०० दिवसांपर्यंतची मजुरी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीमधून दिली जाते. तर १०० दिवसांच्या वरील मजुरी राज्य शासनाच्या निधीतून दिली जाते. त्यानुसार सन २०२४-२५ मध्ये १०० दिवसांपर्यंत मजुरीचे २ हजार ६१६.३० कोटी निधी आणि १०० दिवसांवरील मजुरीचे २४० कोटी रुपये असा एकूण २ हजार ८५६.३० कोटी निधी मजुरांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून सन २०२४-२५ मध्ये अनुक्रमे ६६.२१ कोटी व ५.८८ कोटी रुपये असा एकूण ७२.०९ कोटी इतका निधी मजुरीपोटी पालघर जिल्ह्यातील मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आला असल्याची महिती ‘रोहयो’ विभागाने दिली आहे.