सत्यवान रेडकर यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान

मुंबई:- तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, प्रख्यात व्याख्याते व मुंबई सीमाशुल्क विभागात अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे उच्चविद्याविभूषित कोकण भूमिपुत्र, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांना “लोकहितवादी रावबहाद्दूर सी.के.बोले पुरस्कार 2024 च्या अनुषंगाने समाज रत्न (शैक्षणिक क्षेत्र) पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. भंडारी समाजाचे मानबिंदू, लोकहितवादी रावबहाद्दूर सी.के.बोले व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिंना पुरस्कृत करण्यात आले.

दादर येथील भंडारी मंडळ हॉल येथील कार्यक्रमात श्री. सत्यवान रेडकर यांच्या वतीने “तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेचे अध्यक्ष, श्री. सचिन रेडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मा. सत्यवान रेडकर हे उच्चविद्याविभूषित असून त्यांनी हल्लीच एम.ए (लोक प्रशासन) ही नववी शैक्षणिक अर्हता सुद्धा प्राप्त केली आहे. ते आपल्या वैयक्तिक तसेच शासकीय सुट्ट्यांचा उपयोग विविध जिल्ह्यात, गावात, महाविद्यालयात, शाळांमध्ये किंवा वैयक्तिक नियोजनाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे मानधन न स्वीकारता संपूर्णतः निःशुल्क स्वरूपात शासकीय स्पर्धा परीक्षा या विषयावर जनजागृती व मार्गदर्शन करण्याचे कार्य करतात. त्यांची तिमिरातुनी तेजाकडे नामक शैक्षणिक चळवळ प्रसिद्ध आहे. त्यांनी २६८ निशुल्क मार्गदर्शन व्याख्याने पूर्ण केले असून मार्गदर्शनाच्या माध्यमातून जवळपास २० शासकीय यशोगाथा निर्माण झाल्या आहेत. कोकणाच्या मातीशी असलेली नाळ कायम ठेवत ज्ञानदानाच्या माध्यमातून शासकीय कर्मचारी यांचे गाव तसेच भ्रष्टाचार मुक्त प्रशासन घडविण्यासाठी मा. सत्यवान रेडकर अविरतपणे आपले योगदान देत आहेत. त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल तसेच संपादित केलेल्या नवव्या शैक्षणिक अर्हते बद्दल सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.