संतोषची (बापू) एक्झिट…!!!

काल परवापर्यत संतोष आमच्यातून एवढ्या लवकर निघून जाईल.. हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. जरी परिस्थितीने खचलेला असला तरी स्वतःच्या आत्मबळावर अनेक संकटांना मात करत संतोष चालला होता. सामाजिक बांधिलकी नसानसात भरली होती, जे शक्य होईल, तेवढी मदत करण्याचा प्रयत्न शेवटच्या दिवसापर्यंत संतोषने केली. अनेक प्रसंगांना तोंड देताना हक्काने मला फोन करुन मला “बाबू काय करुयात!” असं विचारणा फोन आता कायमचा बंद झाला… आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत अपघातग्रस्त संतोषचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला, त्याला अपयश आले. मला उपचारादरम्यान सांगत होता…”मी मरतलंय!” हा शब्द खरा झाला. आमचा विश्वास बसत नाही, पण सत्य परिस्थिती आहे. संतोषची एक्झिट मनाला चटका लावणारी आहे.

१६ जून सकाळपासूनच पाऊस खूप होता.नेहमीचे काम आटपून मी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरी पोहचलो. तेवढ्यात सचिन लोके, रघुनाथ लोके, मनोज अश्या सर्वांचेच फोन आले. अरे संतोषचा अपघात झाला, तू कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ये.. मी पोहचलो. प्राथमिक तपासणी होताच, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी छातीला गंभीर दुखापत, डोक्याला जखम असल्याने बाहेर उपचारासाठी न्या, असे सांगितले. त्यावेळी संतोष बोलत होता, “श्वास कोंडतो,ऑक्सिजन लावा,मी नाहीतर मरणार..” मी आणि सचिनने समजवलं. तू आधीच स्वतः चुकीचे बोलू नकोस, कुठे दुखते ते सांग. आम्ही सर्वांनी विलंब न करता डॉ.नागवेकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.गंभीर असल्याचे डॉ.नागवेकर यांनी सांगितले. तरीदेखील विश्वास ठेवून उपचार सुरु केले. संतोषने सुरुवातीला उपचाराला काहीसा प्रतिसाद दिला. आम्ही रात्री १ वाजेपर्यंत पाहत होतो. काही वेळाने प्रतिसाद कमी होत गेला, सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संतोषची प्राणज्योत मालवली.

आम्हा सर्वांसाठी एकच धक्का होता. घरी कसे सांगायचं?काय करायचे?अखेर मनावर दगड ठेवत अंत्यविधी पार पाडला. गावातील मान्यवर, नांदगाव पंचक्रोशी रिक्षा संघटना पदाधिकारी व आमच्या ब्राह्मणदेव मंडळाच्या सर्व कार्यकत्यांनी, गावातील मित्रांनी रात्र जागवली. शेवटी वाईट बातमी आली, संतोषचा श्वास थांबला. तो क्षण आमच्या आयुष्यात दुःखद धक्का देणारा होता.

महामार्ग प्राधिकरण व केसीसी बिल्डकाँनच्या चुकीमुळे संतोषच्या रिक्षाला अपघात झाला. महामार्गावर पाण्याचा लोट, खड्डा असल्याने संतोषचा जीव गेला, हे सत्य आहे.

संतोषने जन्मापासून खूप कष्ट घेतले, शिक्षण झाल्यानंतर नांदगांव कोंळबा देव पतसंस्थेत अनेक वर्षे काम केलं. हे काम करताना काजू कारखाना संतोष चालवत होता. काही वर्षे संतोष रिक्षा व्यवसाय व अन्य काही कामे करुन उपजीविका चालवयाचा. संतोष गेली अनेक वर्षे गावात असल्याने साहाजिकच समाजसेवा करत होता. ब्राम्हणदेव सेवा मंडळाचे काम अनेक पदावर राहून केले. आता माझ्यासोबत सरचिटणीस पदावर काम कार्यरत होता. संतोष तसा मनाने कणखर होता. अनेकदा माझांशी चर्चा करताना अडचणी सांगत असे, मग त्या मंडळाच्या किंवा वैयक्तिक; त्यावर मात करत चालत असताना अचानक अपघातात काळाने डाव साधला.नांदगाव पंचक्रोशीत संतोषने आपल्या प्रेमळ स्वभावाने मोठा मित्र परिवार गोळा केला. त्याचे दृश्य शेवटच्या क्षणी दिसून आले. आता लहान मुले व तुझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

संतोष, हसता हसता गेलास तू,
नेहमी उमलत्या फुलाप्रमाणे जगलास तू,
देहरूपी आमच्यातून गेलास तू,
तुझे कार्य प्रेरणा देत राहील अनंतकाळ…!!

भावपूर्ण श्रद्धांजली…

भगवान लोके (पत्रकार)
अध्यक्ष-ब्राह्मणदेव सेवा मंडळ,असलदे
९४२२३९४५०५

You cannot copy content of this page