कोरोना संकटाचे भान ठेवून, आरोग्य जपत गणेशोत्सव साजरा करूया – मुख्यमंत्री

आगामी गणेशोत्सवासाठी मुंबईतील उत्सव मंडळांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा

मुंबई:- कोरोना विषाणूच्या संकटामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव कोविड-१९च्या आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करावा. यंदाचा उत्सव मर्यादित स्वरुपात साजरा होत असला, तरी पुढील वर्षी मात्र गेल्यावर्षीच्या उत्सवापेक्षा अधिक उत्साहात आणि भव्य-दिव्य असा साजरा करण्याचे प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

मुंबई शहर जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने व्हिसीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये आमदार अजय चौधरी, मुंबई शहर जिल्ह्यातील सार्वजनिक उत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी तसेच विविध मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्याच्या शासनाच्या प्रय़त्नांना सर्वतोपरी सहकार्य करू, अशी भूमिकाही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली.

मुंबईतील गणेश मंडळांची समाजाभिमुख उपक्रमात योगदान देण्याची परंपरा आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात मंडळे आरोग्यविषयक जनजागृती, आरोग्य मेळावे, शिबिरे आदी उपक्रमांद्वारे यावर्षीही हिरिरीने पुढे राहतील, असा विश्वास मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला, यासाठी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी गणेश मंडळांच्या या वैशिष्ट्यांचा पुनरूच्चार करतानाच, त्यांचे कौतुकही केले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोना विषाणूचे सावट असल्याने यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाच्या स्वरुपावर मर्यादा येईल. त्यामुळे यंदा उत्सव मंडळांनी मूर्तींची उंची लहान ठेवण्याबाबत विचार करावा. प्रत्येक छोट्या – मोठ्या गोष्टींचे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांच्या अंगाने नियोजन करावे. उत्सव मंडपही लहान असावेत. सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्यविषयक सर्व काळजी घेण्याचे नियोजनही याठिकाणी करावे लागेल. विषाणूचे संकट टळल्यानंतर, पुढच्या वर्षी हाच गणेशोत्सव गतवर्षीच्या उत्सवाच्या कितीतर पट उत्साहाने साजरा करता येईल. हा विश्वास बाळगून यंदाचा उत्सव साजरा करूया.

चर्चेत सहभागी समितीचे पदाधिकारी तसेच सदस्यांनीही आरोग्य शिबारे, विषाणू प्रादुर्भावाबाबत जनजागृती तसेच वैद्यकीय सेवा-सुविधा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रमांचे नियोजन करू. मूर्तींच्या उंचीबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्यास, त्यांचे पालन केले जाईल. कोरोना विषाणू आणि आरोग्यविषयक आणि स्वच्छतेबाबत शासनस्तरावरून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन केले जाईल, अशी भूमिका मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली.

यावेळी मूर्तीची उंची, उत्सवाचे स्वरूप यांसह पारंपारिक विसर्जन मार्ग आणि गणेश विसर्जन व्यवस्था या अनुषंगानेही चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page