उद्या थेट प्रेक्षपण करीत हंगामी विधानसभा अध्यक्षांनी बहुमत चाचणी घ्यावी! -सर्वोच्च न्यायालय
नवीदिल्ली:- “हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवड करून त्यांच्याद्वारे महाराष्ट्राच्या विधानसभेत उद्या सायंकाळी पाच वाजता बहुमत चाचणी प्रक्रिया घेण्यात यावी, सदर चाचणीचे थेट प्रेक्षपण करण्यात यावे. लोकशाही मूल्यांचं रक्षण झालं पाहिजे. निकाल लागूनही एक महिना झाला तरी लोकनियुक्त आमदारांचा शपथविधी झाला नाही. लोकांना चांगले सरकार मिळाले पाहिजे;” असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी दिला.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची अनुक्रमे देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार यांनी वादग्रस्तरीत्या शपथ घेतली. त्यावर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर परवा आणि काल सुनावणी झाली. आज त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज निकाल दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्राच्या विधानसभेत बुधवारीच संध्याकाळी बहुमत परीक्षण घ्यावं लागणार आहे. हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवड करून त्यांनीच आमदारांच्या शपथविधीनंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. बहुमत चाचणीत गुप्त मतदान घ्यायचे नसून चाचणी प्रक्रियेचं थेट प्रक्षेपण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
लोकशाही मूल्यांचं रक्षण झालं पाहिजे आणि लोकांना चांगले सरकार मिळाले पाहिजे; असे मतही सर्वोच्च न्यायालयाने.नोंदवले असून लोकनियुक्त आमदारांना त्वरित शपथ देणे महत्वाचे असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात असा सत्तासंघर्ष कधीही पाहावयास मिळाला नव्हता. उद्या देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करावे लागणार असून सर्वच राजकीय पक्षांची कसोटी लागणार आहे.