महाराष्ट्र स्वयं व समूह स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना, अध्यक्षपदी आ. प्रविण दरेकर!
महाराष्ट्र स्वयं व समूह स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांना मंत्रिपदाचा दर्जा!
आ. प्रविण दरेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन!
मुंबई (युवराज डामरे)- राज्यातील नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स्वयं व समूह स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना केली असून सदर प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून शासनाने विधान परिषदेचे गटनेते आ. प्रविण दरेकर यांची निवड केली असल्याचे आज शासन निर्णयानुसार जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ह्या निवडीमुळे राज्यातील नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना मिळणार असून त्याचा लाभ गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या लाखो सभासदांना होणार आहे.
यासंदर्भात विधान परिषदेचे गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी एक्सवर पोस्ट करताना म्हटले आहे की, राज्यातील स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र समूह/स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून शासनाने माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. माननीय मुख्यमंत्री श्री. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थकी लावून आगामी काळात स्वयंपुनर्विकास क्षेत्रात मोठे काम झाल्याचे सर्वांना दिसून येईल!
महाराष्ट्र स्वयं व समूह स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपदी आ. प्रविण दरेकर निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन करताना भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी एक्सवर म्हटले आहे की, माझे मित्र आणि विधीमंडळातील सहकारी, विधान परिषदेचे गटनेते आ. श्री. प्रविण दरेकर जी यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! आपण ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना त्यांचे हक्काचे घर मिळवून द्याल, याची पूर्ण खात्री आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
भाजपचे सहकार आघाडीचे मुंबई अध्यक्ष सुनील बांबुळकर, महामंत्री सुधाकर कदम, जेष्ठ कार्यकर्ते व पाक्षिक `स्टार वृत्त’चे सहसंपादक मोहन सावंत तसेच भाजप सहकार आघाडी मुंबईच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विधान परिषदेचे गटनेते आ. प्रविण दरेकर यांचे अभिनंदन केले आहे.
विशेष म्हणजे राज्यातील नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स्वयं व समूह स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना केली व सदर प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून शासनाने विधान परिषदेचे गटनेते आ. प्रविण दरेकर यांची निवड केली आणि त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यात गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी आ. प्रविण दरेकर यांनी ह्यापूर्वी केलेले कार्य लक्षणीय असून त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्याबाबत सहकार क्षेत्रातील अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.