साधा-सोपा राजकारणी! मनोहर पर्रिकरांच्या आदर्शांना मनापासून सलाम!
कालच सायंकाळी गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. देशांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या दुःखद निधनाने देश हळहळला. देश साध्या सोप्या राजकारणी नेतृत्वाला मुकला. त्यांच्या जीवन चरित्राचा सलाम ठोकावा लागेल, अशी त्यांची जीवनशैली!
कालपासून मनोहर पर्रीकर यांच्या सरळ साध्या आणि सोप्या जीवनातील घटना सोशल मीडियावरून आपण वाचल्या असतील. त्यांच्या साधेपणाच्या अनेक घटना नेहमीच चर्चेत राहिल्या. त्यांची अनेक छायाचित्र आपण पाहत असतो की, ज्यामधून त्यांचा साधेपणा स्पष्टपणे दिसतो.
गोवा राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री पद आणि देशाचे संरक्षण मंत्री पद यशस्वीपणे सांभाळत असताना सुद्धा त्यांनी कधीही कुठलाही बडेजाव राखला नाही. आजच्या राजकारणामध्ये ते ठळकपणे उठून दिसायचे; ते त्यांच्या साध्या राहणीमुळे.
आज देशाच्या राजकारण्यांची मिजास आपण दैनंदिन जीवनातही पाहतोय. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणी लोकांची जीवनशैली पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालावी लागतात. एखाद्या पक्षाचा शेवटच्या पातळीवरील वार्ड प्रमुख सुद्धा लाखो-करोडोंच्या उलाढाली करतो, संपविण्याची-खपविण्याची भाषा करतो, राजेशाही थाटात जगतो-वावरतो, श्रीमंतीचे-पदाचे प्रदर्शन करून सर्वसामान्य लोकांवर दबाव आणतो. नगरसेवक, आमदार, खासदार झाल्यावर तर बघायलाच नको. पुर्वी राजे-महाराजे होते, त्यांची संस्थाने होती; पण ह्या लोकशाहीत हीच राजकारणी मंडळी राजासारखी वावरताहेत, हुकुमशहासारखी मनमानी करताहेत. सर्वसामान्यांचा विचार नाही. फक्त निवडणुकीसाठी खोटी आश्वासने देऊन आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ उडवून सर्वसामान्य जनतेला भ्रमिष्ट करायचे आणि आपले काम साध्य करून घ्यायचे; हीच राजकारण्यांची तऱ्हा.
आज लोकशाहीत अनेक घराणी निर्माण झाली आहेत की, त्यांच्याच वारसांनीच नेता बनायचं. सामान्य कार्यकर्ता हा सामान्यच राहतो. त्याच्या मुलांनाही तसंच राहायचं. अशा सर्व अनुचित व्यवस्थेला जेव्हा मनोहर पर्रिकर यांचासारखा उच्चशिक्षित तरुण छेद देऊन पद असूनही सर्वसामान्य जीवन जगतो. तेव्हा ते जीवनचरित्र प्रत्येकाला भावतं.
मनोहर पर्रिकर यांच्या जाण्याने सगळ्यांनी दुःख व्यक्त केलं; पण त्यांनी निर्माण केलेल्या आदर्शावर चालण्याची तयारी राजकारणात सक्रिय असलेल्यांनी दाखवली पाहिजे. हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरू शकेल.
मनोहर पर्रिकर यासारखी व्यक्तिमत्व देशांनी पाहिली. आजही अशा आदर्श व्यक्ती आहेत; जे राजकारणात-सत्ताकारणात असूनही साध्या सोप्या पद्धतीने सर्वसामान्य जीवन जगत आहेत. पण त्याचे प्रमाण हाताच्या बोटावर मोजण्याएवढे आहे. त्यांच्या आदर्शच्या कथा बनतात आणि आम्हाला त्या भावतात. पद आणि सत्ता असताना `हा देश माझा आहे आणि मी या देशाची सेवा करतोय’ हा सेवा भाव प्रत्येकाकडे असायला हवा. विशेषतः नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याकडे हा भाव असलाच पाहिजे.
मनोहर पर्रिकर असेच जगले. ते देशासाठी जगले. वैयक्तीक स्वार्थ नाही की पदावर असताना बडेजाव नाही. पदाचं, सत्तेचं प्रदर्शनही नाही. राजकारणात राहून सत्तेची पदे लाभली असताना कसं वागलं पाहिजे? हेच मनोहर पर्रिकर यांनी दाखवून दिले.
त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने जाण्यास आजचे राजकारणी प्राधान्य देतील; तेव्हाच आमचा देश घडेल. मनोहर पर्रिकरांच्या आदर्शांना मनापासून सलाम!