रासायनिक खतांचा भस्मासूर गाडा- भाई चव्हाण

कणकवली:- गेले काही दिवस रासायनिक खतांच्या तुडवड्याचे कारण पुढे करून होत असलेल्या काळाबाजारामुळे शेतकऱ्यांमध्ये आरडाओरड होत आहे. मात्र या रासायनिक खतांचे पर्यावरणदृष्ट्या जागतिकस्तरावर दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे या रासायनिक खतांच्या भस्मासूराला गाडण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी आता पुर्वीप्रमाणे सेंद्रिय खतांची कास धरली पाहिजे! असे आवाहन कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी पत्रकातून केले आहे.

कालच राज्याचे कृषीमंत्री ना. दादा भुसे यांनी औरंगाबाद येथील रासायनिक खतांची साठेबाजी चव्हाट्यावर आणली. तर कोकणामध्ये तथाकथित शेतकरी नेते रासायनिक खते शेतकऱ्यांना उपलब्ध न झाल्यास आंदोलने करू असे इशारे देत आहेत, असे निदर्शनास आणून श्री चव्हाण यांनी अलीकडे ईशान्य भारतातील सर्व राज्ये सेंद्रिय उत्पादक झाल्याचे जाहीर झाले आहे. अन्य राज्ये हा कित्ता गिरवू लागली आहेत. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात सेंद्रीय शेतीसह जैविक शेती केली जात आहे. पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या शुन्य खर्च-नैसर्गिक आध्यात्मिक शेती-बागायतीची कास अनेकांनी धरली आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी आता अशाच प्रकारे शेती-बागायतीचा अवलबं केला पाहिजे.

रासायनिक खतांमुळे कर्करोगासारख्या आजारांना आमंत्रण मिळते. रोगप्रतिकारशक्ती कमी होते. परिणामी कोरोनासारख्या भविष्यात येऊ घातलेल्या अनेक विषाणूजन्य आजारांना आम्ही स्वत:हून निमंत्रण देणार आहोत, असे स्पष्ट करून श्री. चव्हाण म्हणाले, कोरोना ही आपण इष्टापत्ती समजून भावी पिढीच्या भविष्यासाठी रासायनिक खतांना बाय बाय करून सेंद्रिय, जैविक शेती करायचा संकल्प करायला हवा.

You cannot copy content of this page