द्विविजा वृध्दाश्रमात सिंधुरत्न फाऊंडेशनने केले अन्नदान, पितृपक्षानिमित्त दात्यांना आवाहन!

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर):- सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्रच्या अध्यक्षा व प्रसिध्द अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांनी आपल्या सहकारी महिलांसह कणकवली तालुक्यातील असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित दीविजा वृध्दाश्रमामध्ये जाऊन पितृपक्षा निमित्त अन्नदान आणि आर्थिक मदत केली. अशाप्रकारची आर्थिक मदत दरवर्षी करण्यात येते.

यावेळी फाऊंडेशनच्या श्रद्धा पाटील, शांता पाटील, मीलन पाटील, मयुरा भंडारे, मनीषा मिठबावकर, नंदिता ढेकणे , रविकिरण शिरवलकर, अनिल कांबळी ,सिद्धेश कांबळी ,अनुज कांबळी, हिंदरत्न डॉ सुभाष भंडारे उपस्थित होते. यावेळी सुभाष भंडारे आणि अनिल कांबळी यांनी आर्थिक मदत केली. या आश्रमात एकूण ४५ आजी आजोबा असून यावेळी अक्षता कांबळी यांनी आश्रमातील आजी -आजोबा यांना मालवणी गजाली सांगून आणि सध्या सन मराठीवर “वेतोबा “मालिकेतील गाव मामीचे प्रसिध्द संवाद बोलून सर्वाना खूप हसवले.

काही आजी आजोबा यांनी गाणी म्हणून दाखवली. तसेच डॉ सुभाष भंडारे व सिद्धेश कांबळी यांनी गीते सादर करून आजी -आजोबांना आनंदीत केले. दोन तास खेळीमेळीच्या वातावरणात गेले. यावेळी आश्रमाचे पदाधिकारी संदेश शेट्ये व सर्व कर्मचारी यांनी अक्षता कांबळी आणि सर्वांचे आभार मानले.

पितृपक्ष साजरा करू नव्या पध्द्तीने…
पारंपारिक पद्धतीने पितृपक्ष साजरा करण्यापेक्षा आपण एक दिवसाचे जेवण दीविजा वृध्दाश्रमातील गरजू आजी आजोबांना देऊन एका नवीन कार्याला सुरुवात करुया, असे आवाहन वृध्दाश्रमाकडून करण्यात आले आहे. या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे व आजी आजोबांना आनंद द्यावा.

You cannot copy content of this page