शिंदेवाडी ते थायलंड! व्हाया??? हा `व्हाया’ खूप मोठा आहे….

पा. `स्टार वृत्त’चे सहसंपादक मोहन सावंत यांच्या थायलंड देशातील आध्यात्मिक, सामाजिक आणि आर्थिक अभ्यास दौऱ्यास पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा!

श्री. मोहन सावंत अर्थात सर्वांचे लाडके `बापू’ यांचे बालप दादरच्या शिंदेवाडीत गेले. त्यांना मालवणी-मराठी माणसांच्या सहवासात खूप काही शिकता आले. आता शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सामाजिक बांधिलकी जोपासत नव्या जोमाने विविध सामाजिक जबाबदाऱ्या घेतल्या. मुलगा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर, मुलगी वैद्यकीय सेवा करीत पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तर सहधर्मचारिणी सुविद्य पत्नी सेवानिवृत्त शिक्षिका! असा जरी सुखी संसाराचा चौकोन असला तरी त्या स्वसुखात पुढील आयुष्य आनंदाने जगायचे असा बापूंचा स्वभाव नाही. कारण आर्थिक गरीबी त्यांनी पाहिली, जिवाभावाची माणसं त्यांनी जमविली, स्वार्थी लोकांना वेळेआधीच धडा शिकविला, खरेखुऱ्या मित्रत्वाची नियत जपली, खूप कष्ट केले, हालअपेष्टा भोगल्या-अपमान सहन केले, अडलेल्या लोकांना सहकार्य केले, मदत केली. खऱ्या अर्थाने सामाजिक व्रताचं अधिष्ठान स्थापित करीत सद्गुरुंच्या चरणी दृढ राहिले. शीर्षकामध्ये मी म्हटलंय की, हा व्हाया खूप मोठा आहे, तो हाच व्हाया!

शिंदेवाडीच्या आठवणी सांगताना ते नेहमी सांगतात, “कोणाचं बारावं-तेरावं असो, वर्ष श्राद्ध असो की म्हाळ असो; आम्ही वाडीतील तरुण मित्र आवर्जून त्याच्याकडे जायचो आणि न लाजता पोटभर जेवायचो, `अन्न हे पूर्ण ब्रह्म’ ह्याची जाणीव पोटातली भूक करून द्यायची; जेणेकरून एखादा दिवस बाहेर जेवलो तर घरचं जेवण उरेल आणि घरातील भावंडांना आपल्या वाट्याचे जेवण जेवता येईल, त्यांचं पोट भरेल. बारावं-तेरावं असो वा वर्ष श्राद्ध असो; अनेकजण फक्त उष्टावळ करून पत्रावळीतील जेवण टाकून द्यायचे आणि भरल्या जेवणावरून उठायचे. एवढं चांगलं जेवण – पंचपक्वान्न ते का टाकतात? हे समजायचे नाही. त्यांची किव यायची. कधी कधी रागही यायचा. असो; पण आम्ही मात्र पोटभर जेऊन तृप्त व्हायचो.” हा अनुभव बापू जगले. अशा अनेक प्रत्यक्ष अनुभवातून बापूंचा `व्हाया‘ खूप मोठा झालाय.

अशाप्रकारे एकत्रितपणे बारावं-तेरावं, वर्षश्राद्धचं जेवण जेवायला जाणाऱ्या एका मित्राच्या घरी बापू हल्लीच गेले. त्यांना वाटलं की वरील अनुभव त्या मित्राने आपल्या कुटुंबियांना सांगितला असेल. बापूंनी तो विषय बोलता बोलता काढला. तेव्हा लगेच त्या मित्राने खुणा करून सांगितले की, त्या जुन्या गोष्टी माझ्या मुलांना- पत्नीला सांगू नकोस. आपल्या मित्राची भावना बापूंच्या लक्षात आली; बापूंनी विषय बदलला. ह्या जुन्या आठवणी सांगून आपली पूर्व स्थिती किती हलाखीची होती? हे उघड करायची त्या मित्राला शरम वाटत होती. पण आमच्या बापूंना त्याची लाज शरम कधी वाटली नाही. “मी कसा जगलो? हे सांगायला लाज कसली? जर चोरीमारी केली असती, इतरांची लुबाडणूक केली असती, वाईट काम केलं असती तर लाज वाटली असती.” असं रोखठोक तत्त्वज्ञान ते ठामपणे सांगतात. जीवन जगण्याची कला अशा प्रतिकूल परिस्थितीत सिद्ध होत असते आणि ही सिद्ध झालेली कला बापूंनी जपली. हाच तो `व्हाया‘ खूप मोठा झालेला!

मोहन सावंत काकांना अर्थात बापूंना कोणत्याही कार्यालयात न्या, कोणत्याही थोरामोठ्या व्यक्तीकडे न्या किंवा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीकडे न्या किंवा महाराष्ट्रात कुठेही जा; त्यांची ओळख सापडणारच! बोलता बोलता ते समोरच्या व्यक्तीला चक्क त्याच्या ओळखीच्या व्यक्तींबद्दल सांगू लागतात. ह्याचा अनुभव मीच नव्हेतर त्यांच्याबरोबर राहणाऱ्यांनी निश्चितच घेतला असेल. मी नेहमी गंमतीने मनात म्हणतो, लंडनच्या फुटपाथवर सुद्धा बापूंची ओळख निघेल. हे सर्व कशातून निर्माण होतं? तर जीवनात येणाऱ्या माणसांना आपल्या मनात आदराने स्थापित केल्यावर. बापूंचा हाच तो `व्हाया’ खूप मोठा आहे. म्हणूनच त्यांची आजची परदेश वारी खूप महत्वाची आहे; असं मला वाटतं. थायलंडची राजधानी बँकॉकच्या फुटपाथवर असो की तेथील एअरपोर्टवर असो तेथेही बापू ओळख काढणार हे नक्कीच!

थायलंड देशाचा इतिहास भारताशी जवळीक साधणारा आहे. तेथील भौगोलिक परिस्थितीही मिळतीजुळती आहे. अर्थकारण, सामाजिक व्यवस्था, आध्यात्मिक परंपरा वेगळी असली तरी ती भारतीय वैदिक सनातन संस्कृतीला जवळची आहे. अशा देशामध्ये जाऊन बापूंनी आपला अनुभव अर्थात शिंदेवाडी ते थायलंड मधील अनुभवाने संपन्न असलेला `व्हाया‘ आणखी मोठा करावा! ही सदगुरु चरणी प्रार्थना!

श्री. मोहन सावंत काका अर्थात बापूंना आमच्या खूप खूप शुभेच्छा!

– नरेंद्र राजाराम हडकर

सन्मानिय मोहन सावंत- मैत्री जपणारे आदर्श व्यक्तिमत्व…

सौ. मुग्धा मोहन सावंत- कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास!

You cannot copy content of this page