श्रील प्रभूपादजींचे जीवन ‘एक भारत श्रेष्ठ भारत‘! -पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (सुमित शिंगाणे):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक स्मरणार्थ टपाल तिकीट तसेच नाणे जारी केले. गौडीया मिशनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी वैष्णव पंथाच्या मुलभूत तत्वांचे जतन करण्यात तसेच त्यांचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अनेकानेक महान संतांच्या उपस्थितीमुळे भारत मंडपमची भव्यता अनेक पटींनी वाढली आहे. या वास्तूची संकल्पना भगवान बसवेश्वर यांच्या ‘अनुभव मंडप’ वर आधारित आहे अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की प्राचीन भारतात हा अनुभव मंडप अध्यात्मिक चर्चांचे केंद्र होता. “अनुभव मंडप समाज कल्याणाच्या विश्वासाचा तसेच निर्धाराचा केंद्रबिंदू होता,” ते म्हणाले.” “श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीदिनी भारत मंडपम मध्ये आज अशाच प्रकारची उर्जा जाणवते आहे,” पंतप्रधानांनी सांगितले.भारत मंडपम या इमारतीला भारताची प्राचीनता आणि आधुनिक क्षमतांचे केंद्र म्हणून विकसित करण्यावर सरकारने एकाग्र केलेले लक्ष अधोरेखित करत पंतप्रधान मोदी यांनी नव्या भारतातील संधींची झलक जेथे दिसली त्या नुकत्याच संपन्न झालेल्या जी-20 परिषदांचे स्मरण केले. “आज या ठिकाणी जागतिक वैष्णव संमेलन आयोजित करण्यात आले आहे,” पंतप्रधान म्हणाले. जेथे विकास आणि वारसा यांचा मेळ साधला आहे आणि जेथे आधुनिकतेचे स्वागत होते आणि व्यक्तित्व ही अभिमानाची बाब आहे अशा नव्या भारताचे चित्र या संमेलनात दिसते आहे अशी टिप्पणी त्यांनी केली.या भव्य सोहोळ्याचा भाग होता आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधानांनी भगवान श्रीकृष्णाला वंदन केले. त्यांनी श्रील प्रभुपादजी यांना देखील आदरांजली वाहिली आणि त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट तसेच नाणे जारी करण्यात आल्याबद्दल प्रत्येकाचे अभिनंदन केले.

पंतप्रधान म्हणाले की अयोध्या धाम येथील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानंतर लगेचच श्रील प्रभुपादजी यांची दीडशेवी जयंती साजरी होत आहे. लोकांच्या चेहेऱ्यावर दिसून येत असलेला आनंद पाहून पंतप्रधानांनी साधूसंतांच्या आशिर्वादाला या भव्य यज्ञाच्या पूर्णत्वाचे श्रेय दिले.

भक्तीचा आनंद अनुभवण्याची अनुभूती निर्माण करण्यासाठी चैतन्य महाप्रभूंच्या योगदानाला पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.“चैतन्य महाप्रभू कृष्ण प्रेमाचे आदर्श होते. त्यांनी लोकांसाठी अध्यात्मवाद आणि ध्यानधारणा सुलभ केली ,” असे पंतप्रधान म्हणाले.चैतन्य महाप्रभूंनी आनंदाच्या माध्यमातून ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवला, याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले. पंतप्रधानांनी यावेळी त्यांच्या वैयक्तिक अनुभवाची आठवण सांगितली. जेव्हा आयुष्याच्या एका टप्प्यावर त्यांना असे वाटले होते की, भक्तीपूर्ण जगूनही एक पोकळी, अंतर वाटते आहे. ते म्हणाले की, यानंतर मात्र , मी भजन कीर्तनाच्या आनंदात क्षणात पूर्ण दंग होऊन जात असे .“मला वैयक्तिकरित्या चैतन्य प्रभूंच्या परंपरेची शक्ती जाणवली आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आजही ‘कीर्तन सुरू असताना मी पंतप्रधान म्हणून नाही तर प्रभू भक्त म्हणून टाळ्या वाजवत होतो’.“चैतन्य महाप्रभूंनी कृष्णलीलेचे लालित्य देखील आपल्याला समजावले आणि जीवन समजून घेण्यासाठी त्याचे महत्व देखील अधोरेखित केले, असे पंतप्रधानांनी सांगितले.

“चैतन्य महाप्रभूंसारखी व्यक्तिमत्त्वे त्यांच्या कार्याचा प्रसार वेळोवेळी विविध मार्गाने करत असतात असे सांगत श्रील प्रभुपाद जी हे या श्रद्धेचे मूर्त स्वरूप असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. श्रील प्रभुपाद जी यांच्या जीवनाने आपल्याला ध्यानाने कोणतीही गोष्ट कशाप्रकारे साध्य करायची हे शिकवले आणि अर्थापासून परमार्थाचा म्हणजेच प्रत्येकाच्या कल्याणापर्यंतचा मार्ग प्रकाशित केला, असे त्यांनी सांगितले. श्रील प्रभुपाद जी यांनी संस्कृत, व्याकरण आणि वेदांचे ज्ञान प्राप्त करतानाच 10 वर्षांपेक्षा कमी वयात त्यांना गीता मुखोद्गत होती, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. श्रील प्रभुपाद जी यांनी खगोलशास्त्रीय गणितात सूर्य सिद्धांत ग्रंथाची व्याख्या मांडली आणि सिद्धांत सरस्वती पदवी प्राप्त केली, असे त्यांनी नमूद केले. वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी संस्कृत शाळाही सुरु केली. श्रील प्रभुपाद जी यांनी 100 हून अधिक पुस्तके आणि लेख लिहिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. एक प्रकारे , श्रील प्रभुपाद जी यांनी ज्ञानमार्ग आणि भक्ती मार्गाचे (ज्ञान आणि समर्पणाचा मार्ग) संतुलन जीवनाशी जोडले, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. श्रील प्रभुपाद स्वामींनी जे गांधीजी सांगत असत त्या अहिंसा आणि प्रेमाच्या मानवी संकल्पाच्या वैष्णव भावाचा प्रसार करण्याचे कार्य केले, असे ते म्हणाले.

गुजरातचा वैष्णव भावाशी असलेला संबंध पंतप्रधानांनी अधोरेखित केला.त्यांनी गुजरातमधील भगवान कृष्णाच्या लीला आणि गुजरातमध्ये मीरा बाईंच्या कृष्ण भक्तीत लीन होण्याचा उल्लेख केला. यामुळे कृष्ण आणि चैतन्य महाप्रभूंची परंपरा माझ्या जीवनाचा स्वाभाविक भाग बनली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी 2016 मध्ये गौडीया मिशन शताब्दीच्या वेळी व्यक्त केलेल्या भारताच्या आध्यात्मिक चेतनेबद्दलचे त्यांचे विचार स्मरले. त्यांनी मुळाचे महत्त्व अधोरेखित केले आणि एखादा समाज आपल्या मुळांपासून तुटतो तेव्हा तो स्वतःच्या क्षमता आणि सामर्थ्य विसरतो. गौरवशाली भक्ती परंपरेतही हे घडले, असे त्यांनी सांगितले. बरेच लोक भक्ती, विवेक आणि आधुनिकता यांना विरोधाभासी मानतात मात्र “भक्ती हे आपल्या ऋषीमुनींनी दिलेले एक महान तत्वज्ञान आहे. भक्ती ही निराशा नाही तर आशा आणि आत्मविश्वास आहे. भक्ती हे भय नाही, उत्साह आहे.” भक्ती ही निराशा नाही, ती आशा आणि आत्मविश्वास आहे, यावर त्यांनी भर दिला. भक्ती हा पराभव नाही तर प्रभावाचा संकल्प आहे. भक्ती म्हणजे स्वतःवर विजय मिळवणे आणि मानवतेसाठी कार्य करणे आहे असे ते म्हणाले. या भावनेमुळे भारताने आपल्या सीमा विस्तारण्यासाठी कधीही इतरांवर आक्रमण केले नाही असे ते म्हणाले. लोकांना भक्तीच्या वैभवाची पुन्हा ओळख करून दिल्याबद्दल त्यांनी संतांना अभिवादन केले. “आज स्वातंत्र्याच्या अमृतकाळात देश ‘गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्ती’चा संकल्प करत संतांचे संकल्प पुढे नेत आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीमधील आध्यात्मिक नेत्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये आणि त्याच्या राष्ट्रीय नीतिमूल्याना आकार देण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी भर दिला. आपल्या भक्ति आंदोलनातील संतांनी केवळ स्वातंत्र्य चळवळीतच नव्हे तर प्रत्येक आव्हानात्मक टप्प्यावर देशाला मार्गदर्शन करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. भारताच्या इतिहासात, देशाला विविध क्षमतांमधून दिशा देण्यासाठी प्रमुख संत आणि आध्यात्मिक नेते उदयाला आले,” असे ते म्हणाले.मध्ययुगीन कठीण काळातील संतांची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली. “खरे समर्पण हे केवळ स्वतःला परम शक्तीला समर्पित करण्यात आहे ही शिकवण पूज्य संतांनी आपल्याला दिली ” असे पंतप्रधान म्हणाले. अनेक शतके प्रतिकूल परिस्थिती असलेल्या देशाला त्यांनी त्याग आणि चिकाटी या गुणांची कास धरायला आणि आपल्या सांस्कृतिक मूल्यांचे जतन करायला शिकवले . “त्यांच्या शिकवणींनी आपल्यात हा विश्वास पुनर्स्थापित केला की जेव्हा सत्याच्या रक्षणासाठी जेव्हा आपले सर्व काही अर्पण केले जाते तेव्हा असत्याचा अंत होतो आणि सत्याचा विजय होतो. म्हणूनच, सत्याचा विजय अपरिहार्य आहे – जसे आपण म्हणतो, ‘सत्यमेव जयते‘” असे पंतप्रधान म्हणाले.

स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान, स्वामी विवेकानंद आणि श्रील प्रभुपाद यांसारख्या आध्यात्मिक नेत्यांनी जनमानसात असीम चैतन्य भरले आणि त्यांना नीतिमत्तेच्या मार्गाकडे नेले याची पंतप्रधान मोदी यांनी आठवण करून दिली. ते म्हणाले की नेताजी सुभाष आणि महामना मालवीय यांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी श्रील प्रभुपाद यांचे मार्गदर्शन घेतले.

“बलिदान देऊन देखील अमर राहण्याचा आत्मविश्वास भक्ती योगाच्या अभ्यासातून प्राप्त होतो.” आज याच आत्मविश्वासाने आणि भक्तीने कोट्यवधी भारतीय आपल्या राष्ट्राच्या समृद्धीच्या युगाची सुरुवात करून आध्यात्मिक प्रवासाला निघाले आहेत , यावर पंतप्रधानांनी भर दिला. आपण राष्ट्राला ‘देव’ मानतो आणि ‘देव से देश’ या कल्पनेने पुढे मार्गक्रमण करत आहोत” असे ते पुढे म्हणाले.

“आपण आपली ताकद आणि विविधतेचा उपयोग करून देशाच्या प्रत्येक भागाला प्रगतीच्या केंद्रात परिवर्तित केले आहे.” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “जसे श्री कृष्ण आपल्याला शिकवतात – ‘मी सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात वसलेला आत्मा आहे‘ – आपल्या राष्ट्राच्या विविधतेत असलेल्या एकतेवर भर देतो. विविधतेतील ही एकता भारतीय मानसिकतेत इतकी खोलवर रुजलेली आहे की त्यामध्ये विभाजनाला जागाच नाही,”असे पंतप्रधान म्हणाले. “जगासाठी, एक राष्ट्र राजकीय विचारसरणीचे प्रतिनिधित्व असू शकते, परंतु भारतासाठी, ‘एक भारत श्रेष्ठ भारत‘ ही आध्यात्मिक श्रद्धा आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

श्रील प्रभूपाद जी यांचे जीवन ‘एक भारत श्रेष्ठ भारत‘चे उदाहरण असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की त्यांचा जन्म पुरी येथे झाला, दक्षिणेतील रामानुजाचार्य जी यांच्या परंपरेत त्यांनी दीक्षा घेतली आणि चैतन्य महाप्रभूंची परंपरा पुढे नेली आणि बंगालमधील त्यांचा मठ हे आपल्या आध्यात्मिक प्रवासाचे केंद्र बनवले.“बंगाल हे आध्यात्म आणि बौद्धिकतेच्या शाश्वत उर्जेचा स्त्रोत आहे”, बंगालच्या भूमीने रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, श्री अरविंदो, गुरु रवींद्रनाथ टागोर आणि राजा राममोहन रॉय यांच्यासारखे संत आणि सुधारक राष्ट्राला दिल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

आज भारताचा वेग आणि प्रगतीची सर्वत्र चर्चा होत असून आधुनिक पायाभूत सुविधा आणि हायटेक सेवांमध्ये आपण विकसित देशांच्या बरोबरीने आहोत, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “आपण अनेक क्षेत्रात मोठ्या देशांनाही मागे टाकत आहोत”, भारतीयांना नेतृत्वाच्या भूमिकेत पाहिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “योग जगातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचत आहे आणि आयुर्वेद आणि निसर्गोपचारावरील विश्वासही वाढत आहे. मोदींनी भारतीय तरुणांच्या उर्जेचे श्रेय त्यांच्या दृष्टिकोनातील बदलाला दिले आणि या तरुणांनी ज्ञान आणि संशोधन या दोन्ही गोष्टी सोबत घेण्यावर त्यांनी भर दिला. “आपली नवीन पिढी आता आपली संस्कृती अभिमानाने मिरवताना दिसत आहे”, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. ते पुढे म्हणाले की, “आजच्या तरुणांना अध्यात्म आणि स्टार्ट अप या दोन्हींचे महत्त्व कळते आणि ते या दोन्हीसाठी सक्षम आहेत. परिणामी, काशी आणि अयोध्यासारख्या तीर्थक्षेत्रांवर मोठ्या संख्येने तरुणांचा वावर दिसत आहे.”

भारतातील तरुण पिढीच्या जागरूकतेला अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, “देशाने चांद्रयान तयार करणे आणि चंद्रशेखर महादेव धाम प्रकाशित करणे स्वाभाविक आहे. जेव्हा तरुण देशाचे नेतृत्व करतात तेव्हा ते चंद्रावर रोव्हर उतरवू शकतात आणि लँडिंग स्पॉटला ‘शिवशक्ती’ असे नाव देऊन परंपरांचे पोषण ही करू शकतात. आता वंदे भारत गाड्याही संपूर्ण देशात धावतील आणि वृंदावन, मथुरा आणि अयोध्या या शहरांनाही नवसंजीवनी मिळेल”, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी नमामि गंगे योजनेंतर्गत मायापूर, बंगालमध्ये गंगा घाटाच्या बांधकामाच्या सुरुवातीबद्दलही माहिती दिली.”

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, “विकास आणि वारसा यांच्यातील सहयोग अमृत काल नंतरच्या 25 वर्षांपर्यंत कायम राहील. संतांच्या आशीर्वादाने आपण विकसित भारताची निर्मिती करू आणि आपले अध्यात्म संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्ग मोकळा करेल”,असे म्हणत मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

यावेळी केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि मीनाक्षी लेखी यांची उपस्थिती होती.

गौडीया मिशनचे संस्थापक, आचार्य श्रील प्रभुपाद यांनी वैष्णव पंथाच्या मूलभूत तत्त्वांचे जतन आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गौडिया मिशनने चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीचा आणि वैष्णव धर्माचा समृद्ध आध्यात्मिक वारसा जगभर प्रसारित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, ज्यामुळे ते हरे कृष्ण चळवळीचे केंद्र बनले आहे.

You cannot copy content of this page