सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र…

नमो महारोजगार मेळाव्यासाठी उद्योजक व उमेदवारांना नोंदणी करण्याचे आवाहन!

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का): कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ठाणे जिल्ह्यामध्ये आयलँड ग्राउंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे, (पश्चिम) येथे दि. 24 व 25 फेब्रुवारी रोजी नमो महारोजगार कोंकण विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारानी कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये राज्यातील विविध औद्योगिक आस्थापना व उद्योजक सहभागी होत असल्याने जिल्यातील नोकरीइच्छुक सर्व उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता आपला बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतीसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे.

उद्योजकांनी आपल्याकडील उपलब्ध रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नमो महारोजगार मेळाव्यामध्ये अधिसूचित करावीत. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास उद्योजक तसेच उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग येथे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संपर्क:- ०२३६२-२२८८३५, ९०११३९५३६८, ९४०३३५०६८९ ईमेल आयडी:- sindhudurgrojgar@gmail.com संपर्क करावा.

नमो महारोजगार रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त ग. पां. चिमणकर यांनी केले आहे.

‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यशाळेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का): महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित हे कार्यरत असुन हे महामंडळ सुवर्ण जयंती वर्षात पदार्पण करत आहे. हेच औचित्य साधून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्ग येथे ‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक प्रविण जाहीर यांनी दिली आहे.

या महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) बांधवांना अवगत व्हावी, या उद्देशाने तसेच एम. सी. ई. डी. मार्फत देण्यात येणाऱ्या उद्योजकता विकास प्रशिक्षण संबंधी अर्जदार नोंदणी व प्रशिक्षणाची विस्तृत माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे.

तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) सर्व बांधवांनी या कार्यशाळेमध्ये उपस्थित राहून महामंडळाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपली सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगती साध्य करुन आपला सामाजिक स्तर उंचवावा,असे प्रसिध्दीप्रत्रकाव्दारे कळविले आहे.

महासंस्कृती महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि.6 (जि.मा.का): सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वानाच सुखद क्षणाची आवश्यकता असते. असा आनंद काही प्रमाणात संगीताच्या माध्यमातून प्राप्त होत असल्याने महासंस्कृती महोत्सवासारखे महोत्सव सातत्याने होणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले.

शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महासंस्कृती महोत्सव’ चे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, आमदार नितेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार राजन तेली, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद परब, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, देवगड तहसीलदार तथा परिविक्षाधीन जिल्हाधिकारी विशाल खत्री, पी एम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांताधिकारी अविशकुमार सोनुने आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘महासंस्कृती’ महोत्सवाचे आयोजन डॉ. स्वार हॉस्पीटल समोरील मैदान, सावंतवाडी येथे दि.6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या पाच दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे.

पालकमंत्री पुढे म्हणाले, कोकणची भूमी ही जशी हिरव्यागार निसर्गसौंदर्याने नटलेली आहे तशीच ती लोककला आणि साहित्यानेही नटलेली आहे. आपल्या जिल्ह्याला मोठी सांस्कृतिक व साहित्यिक परंपरा लाभलेली आहे. आपला जिल्हा लोकसंस्कृतीमुळे प्रसिध्द आहे. कला, साहित्य आणि निसर्गसंपन्न आविष्कार म्हणजे आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे.

आपल्या रूढी,परंपरा आणि संस्कृती एका पिढीतुन दुसऱ्या पिढीकडे वारसाने जात असतात. अशा रूढी, परंपरा आणि संस्कृती जपणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, त्यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या महोत्सवातून त्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहचणार आहे. तसेच ‘आयोध्या ‘ ह्या नाट्याचे प्रयोग देखील पंचक्रोशीत घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर म्हणाले, शासन अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत आहे. नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० राज्याभिषेक रायगडावर पार पडला. सांस्कृतिक महोत्सवामधून कलाकारांना व्यासपीठ मिळते असेही ते म्हणाले.

आमदार नितेश राणे म्हणाले, या महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हा वासियांना कलेची मेजवानी मिळाली आहे. हा खूप चांगला महोत्सव आहे आणि यातून अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे. असे महोत्सव सातत्याने होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी किशोर तावडे महोत्सवाविषयी माहिती देताना म्हणाले, या महोत्सवादरम्यान महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील कलाप्रकार आपल्या जिल्ह्यात सादर होणार असल्याने आपल्या जिल्ह्यातील रसिकांना महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील कला व संस्कृतीची ओळख होणार आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध कलाकारांसाठी नेहमीच व्यासपीठ उपलब्ध होत असते, मात्र गाव खेड्यातील होतकरू कलाकारांना व्यासपीठाच्या संधी कमी निर्माण होतात. म्हणून आपण या महोत्सवादरम्यान स्थानिक लोककला आणि कलाकरांना प्राधान्य दिलेले आहे असेही ते म्हणाले.

आभार मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी मानले.

You cannot copy content of this page