रक्ताचा तुटवडा; रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन!

मुंबई:- डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ अद्याप ओसरलेली नाही! दिवाळी आणि निवडणुकांची लगबग यांमुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाले आहे. रुग्णालये हाऊसफुल्ल असल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. अशा परिस्थिती शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘रक्त देता का कोणी रक्त…’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

एकापाठोपाठ आलेल्या सणांच्या सुट्ट्या आणि विधानसभा निवडणूक यामुळे राज्यामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी झाले आहे. परिणामी, राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, मुंबईसह राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. ही परिस्थिती लक्षात घेत राज्य रक्त संक्रमण परिषदेने ३१ जानेवारी २०२५ पर्यंत परराज्यात रक्त हस्तांतरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये कीटकजन्य आजारांप्रमाणेच व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाणही वाढले होते. अनेक जण नुकतेच आजारपणातून उठल्यामुळे लगेच रक्तदान करत नाहीत. शाळा, महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्या लागल्यामुळे आणि अनेक नागरिक गावी गेल्याने रक्तदान शिबिरांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असून, रुग्णांची आणि नातेवाइकांची धावपळ होत आहे.

राज्यात मोठी आपत्ती घडल्यास रक्त तुटवडा प्रकर्षाने जाणवू शकतो. असे असतानाही राज्यातील काही रक्तपेढ्या त्यांच्याकडील अतिरिक्त रक्त व रक्त घटक यांची मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहेत. ही बाब लक्षात घेत रक्तपेढ्यांनी राज्यातील रक्ताच्या गरजेला प्राधान्य द्यावे. अशी भूमिका राज्य रक्त संक्रमण परिषदेने घेतली आहे.

या सूचनांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी सांगितले. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी गृहनिर्माण संस्था संकुलामध्येही शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना रक्तपेढ्यांना देण्यात आल्या आहेत.