महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची शपथ
मुंबई:- महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एक महत्त्वाचा अध्याय जोडला गेला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. प्रभारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत भावपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. सुनेत्रा पवार यांच्या आगमनानंतर सभागृहात ‘अजित दादा अमर रहे’, ‘एकच वादा अजित दादा’, ‘वहिनी आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली. यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे.
शपथविधीपूर्वी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर दिलीप वळसे-पाटील यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यानंतर एकमताने सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. याची अधिकृत माहिती विधिमंडळ सचिवांना कळवण्यात आली.
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे हा राजीनामा सादर केला. सुनेत्रा पवार यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती.
शपथविधीनंतर लगेचच खातेवाटप जाहीर करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास व औकाफ ही खाती देण्यात आली आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील अर्थ खाते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मांडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.










