संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाच्या नूतनीकरण कामाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
मुंबई, दि. १- संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे नूतनीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार झालेल्या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. आज पाहणी केल्यानंतर या प्रदर्शनाबाबत सर्वसामान्यांना तसेच विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यादृष्टीने येथे लेझर शोच्या माध्यमातून माहिती दिली जावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री असलम शेख आदी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर (पश्चिम) येथे २०१० मध्ये निर्मित संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाला ३० एप्रिल २०२२ रोजी एक तप पूर्ण झाले आहे. २८०० चौरस फूट क्षेत्रफळावरील हे विस्तीर्ण तीन मजली दालन म्हणजे संग्रहालय व कलादालन यांचा संगम आहे. येथे इतिहासावर आधारित फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी यावेळी मान्यवरांना दालनातील प्रदर्शनाच्या कामाबाबत माहिती दिली.