वाचनाची आवड जोपासत व्यक्तीमत्व सजग बनवूया! -गोपुरी आश्रम वाचन संस्कृती विकास उपक्रमात युवाईचा संकल्प

कणकवली:- “सद्यकाळात सक्षम आयुष्य जगायचे असेल तर वाचनाची कास धरण्याचा प्रयत्न करायला हवा. मनाची शांती, एकाग्रता आणि बौद्धिक सक्षमता यासाठी वाचन हा महत्त्वाचा पर्याय आहे. यासाठी युवकांनी वाचनालयाची वाट धरायला हवी.” असा संकल्प गोपुरी आश्रम आयोजित वाचन संस्कृती विकास उपक्रमात उपस्थित युवाईने केला.

या कार्यक्रमाला गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, संचालक अर्पिता मुंबरकर, जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी, वाचन संस्कृती सचिव पल्लवी कोकणी, संघटक अंकिता सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.

सदरचा कार्यक्रम प्रसाद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी उपस्थित युवकांपैकी कु.सिमरन हरमलकर हिने प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाश वाटा’ या आत्मचरित्राचे विवेचन करताना बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी नागरिकांसाठी आपल्या ऐश्वर्याच्या जीवनाचा कसा त्याग केला आणि हा आदर्श प्रकाश आमटे यांनी स्वत:च्या जीवनाचे मिशन कसे मानले? कुष्ठरोग्यांची सेवा करता करता वन्य प्राण्यांना कसा जिव्हाळा लावला? याचे अभ्यासपूर्ण विवेचन उपस्थितांसमोर केले.

तर अमेय हिर्लेकर याने प्रेमानंद गज्वी यांच्या ‘हवे पंख नवे’ या नाटकाचे विवेचन केले.

पल्लवी कोकणी हिने सप्टेंबर २०१९ च्या ‘माहेर’ मासिकातील ‘सरकारी खाक्या’ या लेखावर विवेचन करताना सरकारी कामाच्या एकंदर व्यवस्थेवर प्रकाश टाकला.

बंदिनी परब हिने `मिळून साऱ्याजणी’च्या दिवाळी मासिकातील श्रीरंजन आवटे यांच्या ‘चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू’ या लेखाचे विवेचन करताना विशिष्ट वयात आजची तरुण पिढी करीअरच्या शोधात आपली ओळख कशी विसरुन जाते; याविषयी श्रीरंजन आवटे यांनी तरूणांच्या जगण्यासाठी धडपडणाऱ्या अस्तित्वावर टाकलेला प्रकाश सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.

तर अंकिता सामंत हिने याच अंकातील ‘शोघ माझा मला’ या सोनाली दळवी यांच्या ट्रान्सजेंडरच्या प्रवासाबद्दल त्यांनी त्यांच्या पालकांच्या त्यांच्याविषयीच्या असलेल्या गैरसमजाबातचे विचार उपस्थितांना कथन केले.

सोनल भिसे हिने बालकुमार साधना दिवाळी अंकातील गर्विता गुल्हाटी या १२ वर्षाच्या मुलीने राबवलेली हॉटेलमधील पाणी वाचवण्याच्या ‘अर्धा ग्लास प्लीज’ या चळवळीविषयी माहिती सांगितली.

तेजश्री आचरेकर मिनी कुसूमाग्रजांची ‘कणा’ ही कविता सादर केली.

तर अमित राऊळ यांने स्वरचित हौसला ( हिंदी) माणूस या कविता सादर केल्या.

या कार्यक्रमात दोन दिवसांपूर्वी महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि तिची हत्या या विषयावरही चर्चा करण्यात आली. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांना मुली व महिलांनी कसा प्रतिकार करावा? कुटुंब, नातेवाईक व समाजाची भूमिका काय असावी? याबाबत चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसाद सावंत यांनी एकंदर कार्यक्रमाचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित राऊळ यांने, सूत्रसंचालन चिंतामणी सामंत याने तर आभार तेजश्री आचरेकर हिने मानले. या कार्यक्रमाला ४० युवक – युवती सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *