सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

प्रशासनाने सतर्क राहून युध्दपातळीवर उपाय योजना करण्याचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.) : गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. आगामी काळात पावसाचा अंदाज पाहता प्रशासनाने सतर्क राहून युध्दपातळीवर उपाय योजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले.

कोकण विभागातील पूरपरिस्थितीचा आढावा श्री. कल्याणकर यांनी दृकश्राव्य प्रणालीव्दारे घेतला. त्यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यातील ज्या भागातून आपत्तीची माहिती मिळेल. त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेने पाहोचवून नागरिकांना मदत आणि दिलासा देणे आवश्यक आहे. पुर येणाऱ्या भागात तात्पुरते निवारे बांधा, नगर पालिकांना रबरी बोट, लाईफ जॅकेट्स तसेच आवश्यक साहित्य, उपकरणे देऊन सक्षम करा, जिल्ह्यातील सामाजिक संस्थांची मदत घ्या, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. तसेच या काळात सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेऊन परिस्थिीतीचा मुकाबला करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आणि करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती आयुक्तांना दिली. जूनपासून १८८० मिमी म्हणजेच सरासरीच्या १११ टक्के पाऊस झालेला आहे. ५ नद्या धोक्याच्या इशारा पातळीपेक्षा कमीने वाहत आहेत. तिलारी प्रकल्पातून २६० क्युसेक एवढा विसर्ग झालेला आहे. २३२ घरांचे नुकसान झाले असून पंचनाम्याची प्रक्रीया सुरू आहे. भाताची ८१ टक्के पेरणी पूर्ण झाली. १०२ गावे बाधित झाले आहेत. २० दरडग्रस्त प्रवणक्षेत्र आहे. अशा ठिकाणी तहसिलदार नियमितपणे भेटी देत असून आत्तापर्यंत २३२ नागरिकांना स्थलांतरित केले आहे. ४५ गावे पुरग्रस्त आहे. पूरप्रतिबंधक योजनेअंतर्गत १० ते १५ नद्यांतून गाळ काढला असल्याचे सांगून संभाव्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page