ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक शिरीष कणेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली

मुंबई:- आपल्या लेखणीने लाखो वाचकांना निखळ आनंद देणारा ‘कणेकरी’ हरपला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरीष कणेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपले वेगळेपण जपत महाराष्ट्राचे सांस्कृतिक क्षितीज उजळून टाकणारा अवलिया आपल्यातून निघून गेला आहे, अशा शोकपूर्ण भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.

कणेकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या कला-सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, शिरीष कणेकर बहुआयामी-बहुपेडी होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात पत्रकार,चित्रपट व क्रिकेट समीक्षक, ललित लेखक,एकपात्री कलाकार अशा एकाहून अनेक कला-गुणांचा दुर्मीळ असा मिलाफ होता. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलासक्त होते. त्यामुळे त्यांच्याशीही कणेकर यांचे स्नेहबंध होते. कणेकरांच्या हजरजबाबी आणि हरहुन्नरही व्यक्तिमत्वामुळे ते जिथे-जिथे जातील तिथे हास्याची लकेर उमटत असे. चित्रपट आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रातील अनेक घडामोडींचा त्यांचा बारकाईने अभ्यास असे. विसंगती आणि किश्श्यांतून ते हास्याची कारंजी फुलवत राहिले. त्यांनी स्वतःला कुठल्याही क्षेत्राचे बंधन घालून घेतले नाही. त्यामुळे त्यांनी अष्टपैलू खेळाडुसारखी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मैदानात कामगिरी करून ठेवली आहे. त्यांनी फटकेबाजीही केली आणि आणि विकेटही उडवल्या आहेत. अशी कामगिरी कुणी यापुर्वी केली नव्हती, आणि यापुढेही शक्य नाही. स्तंभलेखन, पत्रकारितेच्या अनुषंगाने त्यांनी चौफेर लेखन केले. त्यांच्या पुस्तकांची नावंही मिश्किल आणि दिलखुलास स्वभावाप्रमाणे खट्याळ-अवखळ अशी वैशिष्ट्यपूर्ण राहिली आहेत. या साहित्यनिर्मितीतून, वैशिष्ट्यपूर्ण एकपात्री प्रयोगांच्या सादरीकरणातून त्यांनी विदेशातही लोकप्रियता मिळवली. यातूनही त्यांनी मराठी साहित्याचे वैभव, बहुविविधता जागतिकस्तरावर पोहचवली आहे. त्यांच्यासारखा अवलिया होणे नाही. त्यांच्या जाण्याने मराठी कला-सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अशा या बहुआयामी महाराष्ट्र सुपुत्राला ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक शिरीष कणेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला! –उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई:-“कोट्यवधी भारतीयांचं वेड असलेल्या क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष ही शिरीष कणेकर यांची ओळख होती. क्रिकेट, सिनेमासह अनेक क्षेत्रातील रंजक गोष्टींचा खजिना त्यांच्याकडे होता. या रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला त्यांच्याकडे होती.

या कलागुणांच्या जोरावर त्यांनी क्रिकेट, सिनेमावेड्या मराठी माणसांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या निधनाने सिद्धहस्त लेखक, व्यासंगी पत्रकार, मनस्वी कलावंत, दिलखुलास व्यक्तिमत्वं हरपलं आहे. त्यांच्या अजरामर साहित्यकृती तसंच कथाकथनाच्या कार्यक्रमांमुळे ते कायम आपल्यासोबत राहतील. शिरीष कणेकर यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी शिरिष कणेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

You cannot copy content of this page