`आरबीआय `धृतराष्ट्र’ बनल्याने बँकांचे अस्तित्व धोक्यात!’ -कामगार नेते विश्वास उटगी

 

मुबई:- `आरबीआय `धृतराष्ट्र’ बनल्याने बँकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे!’ असे विधान जेष्ठ कामगार नेते विश्वास उटगी यांनी केले. त्यांनी ह्यावेळी बँकिंग व्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजले आहेत? ह्याचे सविस्तर विवेचन केले. ह्यासंदर्भात सर्वसामान्य जनतेने चिकित्सक होऊन बँकिंग क्षेत्रातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध लढा उभारला पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले.

अमर हिंद मंडळ व अपना परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने सहकारी बँकांचे अस्तित्व संपले आहे का? ह्या अतिशय महत्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ, अभ्यासू, जाणते आणि रोखठोक कामगार नेते विश्वास उटगी बोलत होते.

कामगार नेते विश्वास उटगी यांना औद्योगिक क्षेत्रातील नावाजलेला ‘गं. द. आंबेकर जीवनगौरव पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. विश्वास उटगी यांनी ४० वर्षे बँकेत काम केले. प्रत्येक श्रमिकाला कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे, हे ब्रीद घेऊन ते कामगार चळवळीत उतरले. बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन आणि जगातली सर्वात मोठी संघटना एआयबीईए यांच्या प्रमुखपदी कार्यरत राहून त्यांनी कुशल संघटन कौशल्य दाखविले. केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीने महाराष्ट्राचे सहनिमंत्रक म्हणून त्यांची निवड केली. पाच वर्षपिक्षा अधिक काळ त्यांनी केंद्राच्या कामगारविरोधी धोरणावर आंदोलनाच्या मार्गाने आवाज उठविला. उटगी यांनी मराठवाडा नामांतर, माहितीचा अधिकार, नागरी निवारा परिषद अशा अनेक प्रश्नांवर आवाज उठवून आपले नेतृत्व सिद्ध केले.

अमर हिंद मंडळ व अपना परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर कार्यक्रम आयोजन करण्यात आले. यावेळी अमर हिंद मंडळाचे अध्यक्ष श्री. भास्कर सावंत, कार्याध्यक्ष श्री. दत्ता सावंत, विश्वस्त श्री. अरुण देशपांडे, अपना परिवाराचे ज्येष्ठ सदस्य श्री. बच्चूभाई शहा व खजिनदार श्री. उल्हास फाटक आणि बँकिंग क्षेत्रातील अनेक विद्वान, जाणकार व अभ्यासक उपस्थित होते.