शेतकरी महिला उत्पादक कंपन्यांची गरूडभरारी वाखाणण्याजोगी

मुंबई, दि. २७:-  गडचिरोली, यवतमाळ, वर्धा तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांतील महिलांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत शेतीवर आधारित उत्पादक कंपन्या तयार करून जी गरूडभरारी घेतली ती वाखाणण्याजोगी आहे. महिलांनी या माध्यमातून शेती उत्पादनांसाठी ब्रँडींग, पँकेजिंग आणि ॲमेझॉन प्लॅटफार्मवर आपले उत्पादक आणण्याचा निर्णय घेऊन त्याद्वारे प्रगती साधल्याचा मला आनंद होत आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी ऑनलाईन बैठकीत महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांना सांगितले.

भारताच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘उमेद’ अभियानातील महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांसोबत ग्रामविकास मंत्री श्री.मुश्रीफ यांनी मार्गदर्शनपर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, मुख्य परिचालक अधिकारी परमेश्वर राऊत तसेच दूरदृश्य प्रणालीदारे राज्यातील संचालक मंडळांच्या महिला सदस्य उपस्थित होत्या.

संवाद साधताना ग्रामविकास मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले की, शेतीवर आधारित उत्पादक कंपन्या राज्यभर स्थापन करू शकलो तर देशातील शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा आधार मिळेल. राज्यात आतापर्यंत १३ जिल्ह्यातून ३० उत्पादक कंपन्या स्थापना झाल्या आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्यातील महिला मधाच्या उत्पादनांबरोबरच हिरडा बेहडा, चारोळी, सिताफळ, जांभूळ, आवळा, आंबाडी याबरोबरच शेतकऱ्यांकडील मका, धान, सोयाबिन, कडधान्ये आदी खरेदी करून त्यास अन्य राज्यात पॅकेजिंग करून पाठवितात. गडचिरोलीतील मध सर्वोत्कृष्ट असून या मधाला मोठी किंमत आहे. या महिला शेतकरी उत्पादक कंपनीने १ कोटी ७२ लाख रूपयांची उलाढाल केली आहे. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी सोयाबीन, तूर, हरबरा यासारख्या धान्यांची खरेदी करून त्याच्या विक्रीच्या व्यवसायातून अंदाजे दीड कोटी रूपयांची उलाढाल केली आहे. महिलांनी अशा प्रकारची उत्पादने तयार केली तर आपल्याला खूप चांगली बाजारपेठ मिळू शकेल, असा विश्वास श्री.मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ.हेमंत वसेकर म्हणाले की, उमेदच्या माध्यातून मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या (स्मार्ट) माध्यमातून नवीन २०० शेतकरी उत्पादक कंपनी तयार करण्याचे नियोजन आहे तसेच सन २०२२-२३ मध्ये १०के एफ.पी.ओ. फॉर्मेशन आणि प्रोमोशन या योजनेअंतर्गत २८ नवीन शेतकरी उत्पादक कंपनी तयार करण्यात येणार आहे. इंटेग्रेटेड फार्मिंग क्लस्टर प्रकल्पांतर्गत ७ जिल्ह्यांत १४ नवीन शेतकरी उत्पादक कंपनी तयार करण्यात येणार असल्याचे डॉ. वसेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page