गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध नाहीत!
मुंबई:- दोन वर्षानंतर महाराष्ट्रातील करोनाबाबतचे सर्व निर्बंध हटविण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मास्क घालणं सुद्धा ऐच्छिक असेल!
१ एप्रिल ते ८ एप्रिलपर्यंत राज्य सरकारने संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे गुढीपाडवा, रामनवनी सण साजरा करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. सदर संचारबंदीबाबत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र २ एप्रिल अर्थात गुढीपाडव्यापासून करोनाबाबतचे सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत.
राज्यातली कोरोना महामारी संबंधित आकडेवारी-
चाचणी (टेस्ट) – ७ कोटी ९३ लाख ४७ हजार ५८०
निगेटिव्ह रिपोर्ट- ७ कोटी १४ लाख ७३ हजार ७३९ (९०.१ %)
कोरोनाबाधित- ७८ लाख ७३ हजार ८४१ (९.९ %)
कोरोनातून बरे झालेले रुग्ण- ७७ लाख २५ हजार १२० (९८.११%)
आजचे कोरोनाबाधित रुग्ण- ९३९
कोरोनामुळे मृत्यू- १ लाख ४७ हजार ७८२
मृत्यू दर- १.८८%
आजच्या आकडेवारीनुसार १८३ नव्या करोनाबाधितांची नोंद व एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला. आज एकूण २१९ रुग्ण बरे होऊ घरी परतले.
गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे; नववर्षापासून नवीन संकल्प करुयात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि.३१:- “गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (२ एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत!” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
मात्र कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.
गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलीस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.